कोल्हापूर : ऊस पिकापाठोपाठ आता भुईमूग पिकावरही हुमणीच्या प्रादुर्भावाचे संकट वाढले आहे. जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात शेकडो एकर क्षेत्रातील भुईमूग पिकाला हुमणीचा फटका बसला असून काही ठिकाणी पिकाची अवस्था गंभीर झाली आहे. मात्र, वेळीच खबरदारी घेत आळवणीची प्रक्रिया करणाऱ्या शेतकऱ्यांच्या भुईमूग पिकाची सध्या चांगली वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची जागरूकता पिकासाठी संजीवनी ठरत आहे.
उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता
शिरोळ तालुक्यातील अनेक भागांमध्ये भुईमुगाच्या पिकावर हुमणीचा प्रादुर्भाव झाला आहे. काही शेतांमध्ये हुमणीमुळे पिकाची वाढ खुंटली असून उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. हुमणीचा धोका ओळखून जागरूक शेतकऱ्यांनी वेळ न दवडता आळवणीची कामे हाती घेतली. त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येत असून अशा शेतांमधील भुईमूग सध्या जोमाने वाढत आहे. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांना चांगल्या उत्पादनाची अपेक्षा आहे. याउलट, हुमणीच्या प्रादुर्भावाकडे दुर्लक्ष केलेल्या शेतकऱ्यांच्या शेतातील पिकाची वाढ मोठ्या प्रमाणात खुंटली आहे. परिणामी, उत्पादनात घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
ऊसापाठोपाठ भुईमूग, उडदालाही फटका
यंदाच्या हंगामात शिरोळ तालुक्यात ऊस पिकावर हुमणीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसून आला आहे. आता त्याचा परिणाम भुईमूग आणि उडीद पिकांवरही होत असल्याचे चित्र आहे. हुमणीचा प्रादुर्भाव वेळीच ओळखून योग्य उपाययोजना केल्यास पिकाचे मोठे नुकसान टाळता येते, याचा अनुभव अनेक शेतकऱ्यांना आला आहे. त्यामुळे भुईमूग उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या पिकाची नियमित पाहणी करणे आवश्यक आहे. हुमणीचा प्रादुर्भाव आढळल्यास विलंब न करता कृषी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली योग्य उपाययोजना करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
कमी पाऊस, ढगाळ वातावरणाचीही भर
यंदा पावसाचे अत्यल्प प्रमाण आणि सातत्याने राहिलेले ढगाळ वातावरण याचाही भुईमूग पिकाच्या वाढीवर विपरीत परिणाम झाला आहे. त्यातच हुमणीच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे तालुक्यातील शेकडो एकर भुईमूग पीक नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.हुमणीचा प्रादुर्भाव आणि प्रतिकूल हवामान या दुहेरी संकटामुळे यंदाच्या हंगामात शिरोळ तालुक्यातील भुईमूग उत्पादनात घट होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.


















