नांदेड विभागात ऊस उत्पादनात ४० टक्क्यांपर्यंत घट शक्य; हेक्टरी २० ते २५ टन उताऱ्याचा अंदाज

नांदेड : यंदा समाधानकारक पावसाच्या अपेक्षेने नांदेड विभागातील ऊस लागवड क्षेत्रात वाढ झाली असली, तरी ऑगस्ट महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. पाण्याअभावी उसाची अपेक्षित वाढ खुंटल्याने उत्पादनात ३० ते ४० टक्क्यांपर्यंत घट होण्याचा अंदाज कृषितज्ज्ञ आणि शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे साखर उत्पादनावर परिणाम होण्याबरोबरच कारखान्यांचा गाळप हंगामही यंदा लवकर संपण्याची शक्यता दैनिक सकाळमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तातून व्यक्त करण्यात आली आहे.

क्षेत्र वाढले, मात्र उत्पादन घटण्याची भीती

ChiniMandi WhatsApp Channel

नांदेड विभागातील नांदेड, परभणी, हिंगोली आणि लातूर या चार जिल्ह्यांत उसाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते. मागील उपलब्ध आकडेवारीनुसार, विभागातील ऊस लागवड क्षेत्र १ लाख २५ हजार ४८५ हेक्टर होते. यंदा त्यात वाढ होऊन हे क्षेत्र १ लाख ३५ हजार १२६.६५ हेक्टरवर पोहोचले आहे. लागवड क्षेत्र वाढल्यामुळे यंदा साखर उत्पादनात वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, पावसाने दीर्घकाळ खंड दिल्याने या अपेक्षांना धक्का बसला आहे.

सर्वसाधारणपणे प्रतिहेक्टरी ३० ते ४० टन ऊस उत्पादन मिळण्याची अपेक्षा असते. परंतु, सध्याच्या परिस्थितीत अनेक भागांत हेक्टरी केवळ २० ते २५ टन उत्पादन मिळण्याची शक्यता आहे.पावसाअभावी जमिनीतील ओलावा कमी झाल्याने उसाच्या वाढीवर विपरीत परिणाम झाला आहे. लागवड, मशागत आणि सिंचनासाठी केलेला खर्च लक्षात घेता उत्पादनातील घट शेतकऱ्यांच्या आर्थिक गणितावर परिणाम करणारी ठरणार आहे.

उत्पादन घटल्याने दरवाढीची अपेक्षा

शेती अभ्यासक प्रल्हाद इंगोले यांच्या मते, यंदा मराठवाड्यात उसाच्या उत्पादनात ५० टक्क्यांपेक्षा अधिक घट झाल्याचे चित्र दिसत आहे. यापूर्वी प्रतिएकर ४० ते ५० टनांपर्यंत उत्पादन मिळत होते. मात्र, यंदा हा उतारा घटून २५ ते ३० टनांपर्यंत आल्याचे त्यांनी सांगितले.उत्पादनातील घट आणि वाढता उत्पादन खर्च यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी उसाला प्रतिटन किमान पाच हजार रुपये दर मिळावा, अशी अपेक्षा इंगोले यांनी व्यक्त केली.

गाळप हंगाम अडीच महिन्यांत संपण्याची शक्यता

ऑगस्ट महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने नांदेड जिल्ह्यात ऊस उत्पादनात सुमारे ४० टक्क्यांपर्यंत घट होण्याचा अंदाज ऊस उत्पादक शेतकरी व्यक्त करीत आहेत. उत्पादन कमी झाल्यास साखर कारखान्यांना अपेक्षित प्रमाणात ऊस उपलब्ध होणार नाही. परिणामी, यंदाचा गाळप हंगाम अवघ्या दोन ते अडीच महिन्यांतच संपण्याची शक्यता वर्तवली जात आहे.दरम्यान, जनावरांसाठी चाऱ्याची गरज वाढल्याने ऊस तोडणीच्या पद्धतीतही बदल दिसून येत आहे. काही शेतकरी यंत्राद्वारे ऊस तोडण्याऐवजी मजुरांकडून हाताने तोडणी करण्यास प्राधान्य देत आहेत. त्यामुळे पावसाच्या खंडाचा परिणाम केवळ ऊस उत्पादनावरच नव्हे, तर शेतकऱ्यांचे उत्पन्न, चारा व्यवस्थापन आणि साखर कारखान्यांच्या गाळप नियोजनावरही होण्याची चिन्हे आहेत.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here