जळगाव : बेलगंगा साखर कारखान्याच्या ५५० कामगारांना मिळणार ६ कोटींचा पीएफ, न्यायालयाने दिला आदेश

जळगाव : चाळीसगाव तालुक्यातील सन २००२ पासून बंद पडलेल्या बेलगंगा कारखान्याकडील जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या थकीत कर्जापोटी बँकेने कारखान्याची मालमत्ता जप्त करून तिचा लिलाव केला होता. लिलाव प्रक्रियेतून प्राप्त झालेल्या रकमेतून ११ कोटी रुपये उच्च न्यायालयात जमा करण्यात आले होते. कारखान्यातील कामगार संघटनेने कामगारांच्या थकीत देण्यांवर व पीएफवर मालमत्तेचा प्रथम बोजा असल्याचे नमूद करत रिट याचिका दाखल केली होती. या कारखान्यातील कामगारांच्या थकीत भविष्य निर्वाह निधीच्या (पीएफ) हक्कासाठी सुरू असलेल्या २२ वर्षांच्या लढ्याला मोठे यश आले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने कारखान्यातील ५०० ते ५५० हून अधिक कायम व हंगामी कामगारांच्या थकीत पीएफपोटी ६ कोटी १६ लाख ८९ हजार ३६५ रुपये व्याजासह वितरीत करण्याचे अंतरिम आदेश दिले आहेत. उर्वरित सुमारे ५ कोटींची रक्कम उच्च न्यायालयाच्या मुदत ठेवीत जमा राहणार आहे. या रकमेचे वाटप बँकेच्या प्रलंबित याचिकेवरील अंतिम निकालानंतर निश्चित केले जाईल.

न्यायमूर्ती किशोर सी. संत आणि न्यायमूर्ती जितेंद्र जैन यांच्या खंडपीठाने हा महत्त्वपूर्ण निकाल दिला. सर्वोच्च न्यायालयाच्या ताज्या न्याय निर्णयानुसार सरफेसी कायद्यापेक्षा ईपीएफ व एमपी कायद्यांतर्गत कामगारांचा भविष्य निर्वाह निधीचा दावा अग्रक्रमावर (प्रथम बोजा) राहतो. सुरक्षित कर्जदारापेक्षा (बँकेपेक्षा) कामगारांच्या हक्काच्या पैशांना प्राधान्य देणे बंधनकारक असल्याचे न्यायालयाने अधोरेखित केले.कामगार संघटनेच्या वतीने अॅड. संकेत कुलकर्णी यांनी, तर पीएफ विभागाच्या वतीने अॅड. एन. के. चौधरी यांनी कामकाज पाहिले. या प्रकरणाची अंतिम सुनावणी २९ ऑक्टोबर २०२६ रोजी होणार आहे. या निर्णयानंतर कामगार प्रतिनिधींनी २७ ऑगस्ट रोजी चाळीसगाव येथे आयोजित पीएफ २.० कॅम्पदरम्यान प्रादेशिक भविष्य निर्वाह निधी आयुक्तांची भेट घेतली. आयुक्तांनी कागदपत्रांची पडताळणी करून रक्कम लवकरात लवकर वाटप करण्याचे सकारात्मक आश्वासन दिले. संघटनेचे अध्यक्ष बापूराव पाटील, सचिव अशोक पवार, नीळकंठ देशमुख, पी. आर. पाटील, प्रल्हाद पाटील, सूर्यवंशी, प्रकाश निकम, पांडूरंग कोतकर, सुभाष पाटील आदी उपस्थित होते.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here