मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट : कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्याची मागणी, अनेक भागांत पिकांची स्थिती अत्यंत खराब

लातूर : मराठवाड्यात तातडीने कृत्रिम पावसाचा प्रयोग करावा, अशी मागणी माजी आमदार धीरज देशमुख यांनी केली आहे. देशमुख यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओद्वारे ही मागणी केली आहे. ‘सरकारनामा’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तात म्हटले आहे कि, मराठवाड्यातील अनेक भागांत पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रस्तावाचा गांभीर्याने विचार करावा, असे आवाहन देशमुख यांनी केले आहे.

मराठवाड्यातील अनेक भागांत पिकांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत असून, शेतकरी चिंतेत आहेत. पावसाची प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत असल्याचे देशमुख यांनी व्हिडिओमध्ये म्हटले आहे.त्यातच भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) सप्टेंबर महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे चिंता आणखी वाढली आहे. कमी पाऊस झालेल्या भागांमध्ये कृत्रिम पावसाचा प्रयोग करावा, अशी मागणी देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्याकडे केली आहे.

ChiniMandi WhatsApp Channel

अपुऱ्या पावसामुळे शेतकरी अडचणीत असून पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे सरकारने केवळ पावसाची प्रतीक्षा न करता उपलब्ध असलेल्या वैज्ञानिक आणि तांत्रिक पर्यायांचा तातडीने विचार करावा, असे देशमुख यांनी म्हटले आहे. कृत्रिम पावसाच्या प्रयोगामुळे पाऊस पडेलच याची शाश्वती देता येत नाही, हे मान्य करतानाच या प्रयोगामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.

उर्वरित पावसाळ्यात अनुकूल हवामान आणि ढगांची स्थिती उपलब्ध होण्याची शक्यता असल्याने याच कालावधीत कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्यात यावा, असे देशमुख यांनी सुचवले आहे.धीरज देशमुख म्हणाले, “शेतकरी अडचणीत आहेत. त्यामुळे प्रत्येक वैज्ञानिक पर्यायाचा विचार करण्याची गरज आहे. आपण शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत, हे सिद्ध करण्याची हीच वेळ आहे.”

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here