नवी दिल्ली : अमेरिकेकडून भारताच्या स्पर्धक देशांच्या तुलनेत भारतीय उत्पादनांना प्राधान्य दर (Preferential Tariff Rates) देण्याची तयारी दर्शविल्यानंतरच भारत अमेरिकासोबतच्या प्रस्तावित द्विपक्षीय व्यापार कराराला (BTA) अंतिम रूप देईल आणि त्याचा अंतिम तपशील जाहीर करेल, असे केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी गुरुवारी सांगितले. एका राष्ट्रीय कार्यशाळेला संबोधित करताना गोयल म्हणाले, अमेरिका आमच्या स्पर्धक देशांच्या तुलनेत आम्हाला प्राधान्य दर देण्यास सक्षम होताच; आम्ही बीटीएला अंतिम रूप देऊ आणि त्याचा अंतिम तपशील जाहीर करू.
भारताने यापूर्वी अंतिम रूप दिलेल्या व्यापार करारांमुळे देशातील उद्योग आणि व्यवसायांसाठी निर्यातीच्या मोठ्या संधी उपलब्ध होत आहेत, असेही गोयल यांनी सांगितले. येत्या काही महिन्यांत आणि वर्षांत भारत आणखी अनेक देश व गटांसोबत व्यापार करार पूर्ण करण्याच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे त्यांनी सांगितले. भारत आणि अमेरिका परस्परांना लाभदायक ठरणाऱ्या द्विपक्षीय व्यापार करारासाठी (BTA) दीर्घकाळापासून चर्चा करत आहेत.
जूनमध्ये झालेल्या ताज्या घडामोडींमध्ये अमेरिकेचे व्यापार प्रतिनिधी राजदूत जेमीसन ग्रीयर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने नवी दिल्लीला भेट दिली. या शिष्टमंडळाने केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल यांची भेट घेऊन ‘बीटीए’च्या प्रमुख मुद्द्यांचा आढावा घेतला आणि अंतरिम कराराच्या दिशेने चर्चा पुढे नेली.2025 मध्ये भारताची अमेरिकेला होणारी एकूण वस्तू निर्यात 103.82 अब्ज डॉलर इतकी होती. त्याच वेळी अमेरिकेची भारताला होणारी वस्तू निर्यात सुमारे 45.6 अब्ज डॉलर होती. त्यामुळे 2025 मध्ये दोन्ही देशांमधील एकूण वस्तू व्यापार 149.42 अब्ज डॉलर इतका राहिला.2025 मध्ये भारत आणि अमेरिकेतील सेवा व्यापार 92.23 अब्ज डॉलर इतका नोंदवला गेला. यामध्ये भारताने अमेरिकेला 48.67 अब्ज डॉलरच्या सेवांची निर्यात केली, तर अमेरिकेकडून भारताने 43.56 अब्ज डॉलरच्या सेवांची आयात केली.


















