महाराष्ट्र : साखर कारखान्यांनी ऊसतोड मजुरांच्या सुरक्षित मुक्कामाची व्यवस्था करण्याचे साखर आयुक्तांचे आदेश

सोलापूर : आगामी गळीत हंगामात ऊसतोड मजुरांच्या मुक्कामाच्या ठिकाणी पाणी, निवास, स्वच्छता, आरोग्य आणि शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश राज्य सरकारच्यावतीने देण्यात आले आहेत. मजुरांसाठी बांधकाम करून देणे शक्य नसल्यास पत्र्याचे शेड किंवा तात्पुरत्या निवाऱ्याची व्यवस्था करावी, अशा सूचनाही करण्यात आल्या आहेत. साखर आयुक्तांनी साखर कारखान्यांना याबाबत कडक सूचना दिल्या आहेत.

उच्च न्यायालयाच्या निर्देशांच्या पार्श्वभूमीवर जारी करण्यात आलेल्या या परिपत्रकामुळे साखर कारखान्यांवर ऊसतोड मजुरांच्या सुविधा आणि सुरक्षेची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. वाहतूक करणाऱ्या वाहनांमध्ये मजूर आणि त्यांच्या मुलांच्या सुरक्षेची काळजी घेण्याबाबतही स्पष्ट सूचना करण्यात आल्या आहेत. ऊसतोड मजुरांच्या संपूर्ण हंगामाच्या कालावधीत पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी कारखान्यांवर टाकण्यात आली आहे.

ChiniMandi WhatsApp Channel

साखर आयुक्त डॉ. संजय कोलते याांनी जारी केलेल्या परिपत्रकानुसार, मुक्कामासाठी जागा देताना पक्के घर बांधण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याची तरतूद करण्याबाबतही कारखान्यांना निर्देश आहेत. ऊसतोड मजुरांच्या कुटुंबातील महिला आणि बालकांच्या सुरक्षेसाठीही परिपत्रकात विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. या सर्व सूचनांची अंमलबजावणी करण्यासाठी संबंधित प्रादेशिक सहसंचालकांनी ऊसतोडणी हंगाम सुरू होण्यापूर्वी साखर कारखान्यांच्या बैठका घेऊन नियोजन करावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.

ऊसतोडणीच्या कामादरम्यान मजूर अथवा त्यांच्या कुटुंबीयांचा अपघात झाल्यास तातडीने उपचार मिळावेत, यासाठी आवश्यक व्यवस्था करण्याचे निर्देश कारखान्यांना देण्यात आले आहेत. ऊसतोड मजुरांच्या मुलांना शिक्षणापासून वंचित राहावे लागू नये, यासाठी जवळच्या जिल्हा परिषद, नगरपालिका तसेच प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये प्रवेश मिळवून देण्याच्या सूचना आहेत. साखर कारखान्यांनी संबंधित शाळांशी समन्वय साधून मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था करावी, असे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here