नवी दिल्ली : आर्थिक वर्ष 2026-27 (FY27) मध्ये भारताची आर्थिक वाढ 7 टक्क्यांहून अधिक राहण्याची शक्यता आहे. गुंतवणूक आणि निर्यात चक्रातील वाढीमुळे उपभोगातील संभाव्य मंदी तसेच देशांतर्गत धोरणात्मक पाठबळाचा कमी होत जाणारा प्रभाव भरून निघण्याची अपेक्षा आहे. एसबीआय फंड्स मॅनेजमेंट (SBIFM) रिसर्चच्या ताज्या अहवालात हा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. फंड व्यवस्थापन कंपनीच्या अंदाजानुसार, आगामी तिमाहींमध्ये नाममात्र जीडीपी वाढ 12 टक्क्यांहून अधिक होऊ शकते. मात्र, महागाईचा दबाव कायम राहिल्यास आणि जागतिक कमोडिटीच्या किमती वाढलेल्या राहिल्यास व्याजदर दीर्घकाळ उच्च पातळीवर राहण्याची शक्यता आहे.
SBIFM रिसर्चने म्हटले आहे की, नवीन कोणताही जागतिक धक्का बसला नाही तर FY27 मधील आर्थिक वाढीचा अंदाज 7 टक्क्यांहून अधिक जाऊ शकतो. महागाईचा दबाव कायम राहिल्यास मजबूत आर्थिक वाढीमुळे भारतातील वास्तविक व्याजदरांमध्ये आणखी वाढ करण्यास वाव निर्माण होऊ शकतो. FY27 च्या पहिल्या तिमाहीत वास्तविक जीडीपीमध्ये वर्ष-दर-वर्ष 7.8 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली. यामध्ये उपभोगाऐवजी गुंतवणूक आणि निर्यात हे आर्थिक वाढीचे प्रमुख आधार ठरले आहेत.
गुंतवणूक आणि निर्यातीमुळे अर्थव्यवस्थेला बळ
अहवालानुसार, आर्थिक वाढीची रचना विशेषतः उत्साहवर्धक आहे. वास्तविक एकूण स्थिर भांडवली निर्मिती आणि निर्यातीत सुमारे 12-12 टक्के वाढ झाली आहे, तर उपभोगात 7.1 टक्क्यांची वाढ झाली. कॉर्पोरेट भांडवली खर्चातही वाढ होण्याची अपेक्षा आहे. BSE 500 कंपन्यांच्या भांडवली खर्चात FY27 मध्ये 11 टक्के वाढ होण्याचा अंदाज आहे. FY26 मध्ये या कंपन्यांनी 10.4 लाख कोटी रुपयांचा भांडवली खर्च केला होता. अहवालानुसार, अतिरिक्त कॉर्पोरेट भांडवली खर्चामध्ये वीज क्षेत्राचा वाटा सुमारे 55 टक्के राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर लोह आणि पोलाद तसेच भांडवली वस्तू क्षेत्राचा क्रमांक लागतो.
निर्यात आणि उत्पादन क्षेत्रावर वाढणार भर
अहवालात म्हटले आहे की, देशांतर्गत धोरणात्मक प्रोत्साहनाचा प्रभाव कमी होत असताना आणि उपभोगाचा विस्तार तुलनेने मर्यादित होत असताना, आर्थिक वाढीचा अधिक भार गुंतवणूक चक्र आणि जागतिक व्यापार चक्रावर राहणार आहे. त्यामुळे निर्यात, उत्पादन, भांडवली वस्तू आणि व्यवसायाभिमुख इतर क्षेत्रे तुलनेने अधिक आकर्षक ठरू शकतात. याउलट, उपभोगावर आधारित क्षेत्रांमध्ये अधिक निवडक पद्धतीने गुंतवणूक करण्याचा सल्ला अहवालात देण्यात आला आहे.
महागाई आणि व्याजदरांबाबत जोखीम
आर्थिक वाढीचे हे सकारात्मक चित्र असले तरी महागाई आणि मौद्रिक धोरणाशी संबंधित जोखीम कायम आहेत. SBIFM च्या मते, पुढील सहा महिन्यांत ब्रेंट कच्च्या तेलाच्या किमती उच्च पातळीवर राहू शकतात. चीनकडून तेल साठ्याची पुनर्बांधणी, युरोपमधील गॅस साठ्याची अपुरी पातळी आणि अमेरिकेतील कच्च्या तेलाच्या साठ्यातील घट हे त्यामागील प्रमुख घटक आहेत. या पार्श्वभूमीवर जागतिक स्तरावरील व्याजदर दीर्घकाळ उच्च पातळीवर राहण्याची शक्यता अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.
FY27 मध्ये RBIकडून दरवाढीची शक्यता
भारताच्या संदर्भात SBIFM च्या अंदाजानुसार, भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) भविष्यात सध्याच्या तटस्थ भूमिकेतून मौद्रिक धोरण अधिक कडक करण्याच्या दिशेने वाटचाल करू शकते. FY27 मध्ये एकूण सुमारे 50 बेसिस पॉइंट्सची व्याजदरवाढ होण्याची शक्यता असल्याचे अहवालात म्हटले आहे. मात्र, दरवाढीची वेळ आणि तिची व्याप्ती आर्थिक आकडेवारी व परिस्थितीनुसार निश्चित होईल.


















