इथेनॉल उद्योग पूर्ण क्षमतेने चालविण्यासाठी ठोस धोरण गरजेचे असल्याचे माजी मंत्री राजेश टोपे यांचे मत

जालना : महाराष्ट्रातील इथेनॉल उद्योगामध्ये गेल्या काही वर्षांत मोठी गुंतवणूक झाली आहे. केंद्राच्या ई-२० धोरणाला प्रतिसाद देत साखर कारखान्यांनी हजारो कोटी रुपयांची गुंतवणूक करून मोठी आसवनी (डिस्टिलरी) क्षमता उभारली आहे. साखर-आधारित डिस्टिलरींच्या क्षमतेवरच सुमारे १६,५०० ते २०,३०० कोटी रुपयांची गुंतवणूक झालेली असू शकते तर राज्यातील एकूण १६,१५२ केएलपीडी क्षमतेसाठी अंदाजे २१ हजार ते २६ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक झाल्याचा अंदाज आहे. ही इथेनॉल निर्मिती क्षमता पूर्ण क्षमतेने वापरता यावी, यासाठी केंद्र व राज्य शासनाने धोरण आखण्याची गरज असल्याचे मत माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केले. आगामी २०२६-२७ इथेनॉल हंगामात या उद्योगासमोर कच्च्या मालाच्या उपलब्धतेपासून ते कर्जफेडीपर्यंत अनेक गंभीर आर्थिक आव्हाने निर्माण होण्याची शक्यता आहे, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. केंद्र सरकारने कच्च्या मालाची शाश्वत उपलब्धता, ड्युअल-फीड तंत्रज्ञान, धान्याधारित इथेनॉलचा योग्य समतोल, सी-हेवी मोलॅसिसचा कार्यक्षम वापर आणि उपउत्पादनांचे मूल्यवर्धन याचा विचार करण्याची गरज आहे असे मत त्यांनी व्यक्त केले.

माजी मंत्री टोपे यांनी सांगितले की, राज्यातील ३६ धान्याधारित डिस्टिलरींमधून सुमारे १०४ कोटी लिटर वार्षिक उत्पादनाची क्षमता उपलब्ध आहे. सी-हेवी मोलॅसिसपासून मिळणारे संभाव्य १०४.५६ कोटी लिटर आणि धान्यापासून मिळणारे सुमारे १०४ कोटी लिटर एकत्रित केल्यास सुमारे २०८.५६ कोटी लिटर इथेनॉल उपलब्ध होण्याची शक्यता आहे. देशांतर्गत बाजारात गेल्या दोन ते तीन महिन्यांत साखरेच्या दरात झालेली वाढ आणि साखरेचा पुरवठा व दर नियंत्रणात ठेवण्याच्या दृष्टीने ऊसाचा थेट रस तसेच बी-हेवी मोलॅसिसपासून इथेनॉल निर्मितीवर संभाव्य निर्बंध यामुळे साखर उद्योगासमोर अडचणी निर्माण होऊ शकतात. भविष्यात डिस्टिलरी केवळ इथेनॉल विक्रीवर अवलंबून न राहता विविध उपउत्पादनांतून उत्पन्न मिळविणाऱ्या एकात्मिक जैव-शुद्धीकरण केंद्रांमध्ये विकसित करणे गरजेचे आहे. मोठ्या गुंतवणुकीतून उभारलेल्या प्रकल्पांचा क्षमतेनुसार वापर न झाल्यास अडचणी येऊ शकतात. त्यामुळे आगामी २०२६-२७हंगामात महाराष्ट्रासमोर साखरेचा देशांतर्गत पुरवठा व दर नियंत्रणात ठेवणे, ई-२० साठी आवश्यक इथेनॉल उपलब्ध करून देणे आणि आधीच झालेल्या हजारो कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची आर्थिक व्यवहार्यता टिकविणे, अशी तिहेरी आव्हाने आहेत. वर्षभर पूर्ण क्षमतेने, पुरेशा कच्च्या मालावर आणि आर्थिकदृष्टया फायदेशीर पद्धतीने आपले युनिट चालविणे याकडे साखर कारखान्यांनी लक्ष द्यायला हवे. राज्यातील इथेनॉल उद्योगाने मोठी पायाभूत क्षमता उभी केली आहे. तिचा पुरेपूर वापर व्हायला हवा. अशी भूमिका माजी मंत्री टोपे यांनी मांडली.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here