सोलापूर : विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याच्यावतीने माढा तालुक्यात अत्याधुनिक व सुसज्ज रुग्णालय उभारण्यात येणार असून, सभासदांना उपचारात ५० टक्के सवलत देण्यात येईल अशी घोषणा संस्थापक अध्यक्ष, माजी आमदार बबनराव शिंदे यांनी केली. कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा त्यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी ते बोलत होते. कारखान्यातर्फे सीना-माढा उपसा सिंचन योजनेचे वीजबिल भरण्यासाठी लाभार्थी सभासदांना प्रतिटन पाच रुपये अतिरिक्त देण्यात येणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.प्रारंभी माजी आमदार कै. विठ्ठलराव शिंदे यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. कार्यकारी संचालक एस. एन. डिग्रजे यांनी अहवाल व ठरावांचे वाचन केले. ते सभासदांनी मंजूर केले.
यावेळी शिंदे यांनी यंदा समाधानकारक पाऊस नसल्याने उसाची वाढ कमी झाली असून, रिकव्हरी सात टक्क्यांपर्यंत राहण्याची शक्यता व्यक्त केली. मागील वर्षाच्या रिकव्हरीनुसार एफआरपी देताना साखर कारखान्यांवर पडणारा फरक केंद्र व राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावा, अशी मागणी त्यांनी केली. दुष्काळी परिस्थितीत चारा छावण्या, पिण्याच्या पाण्याचे टँकर व पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याबाबत कार्यवाही सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. रणजितसिंह शिंदे यांनी यंदाचा गळीत हंगाम सुमारे ७० दिवसांचा होण्याची शक्यता व्यक्त केली.
उसाला कारखान्याने प्रतिटन ३१२५ रुपये दर दिल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी सिद्धेश्वर घुगे, प्रताप घाडगे, ब्रह्मदेव मस्के, संतोष चंदनकर, सागर हुंबे, संजय पवार आणि भीमराव ढवळे यांची तज्ज्ञ संचालक म्हणून निवड झाली. कारखान्याचे उपाध्यक्ष पोपट गायकवाड, सर्व संचालक, कार्यकारी संचालक एस. एन. डिग्रजे, युनिट नंबर दोनचे जनरल मॅनेजर पी. एस. येलपले, युनिट नंबर एक व दोनचे खातेप्रमुख, कर्मचारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. रवींद्र जाधव यांनी सूत्रसंचालन केले. संचालक अमोल चव्हाण यांनी आभार मानले.


















