कोल्हापूर : वाढती महागाई आणि वाढलेला उत्पादन खर्च लक्षात घेऊन यंदा उसाला योग्य दर द्यावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने अन्नपूर्णा शुगरकडे निवेदनाद्वारे केली. या निवेदनाची दखल घेत राज्यातील इतर कारखान्यांच्या ऊसदराचा चर्चेतून जो अंतिम तोडगा निघेल, त्यानुसार अन्नपूर्णा शुगरकडून दर दिला जाईल, अशी भूमिका कारखान्याचे संस्थापक माजी आमदार संजय घाटगे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केली. केनवडे येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
खते, औषधे, बियाणे, कीटकनाशके यांच्या किमतीत मोठी वाढ झाल्याने ऊस उत्पादनाचा खर्च वाढला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना समाधानकारक दर मिळावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली होती. घाटगे म्हणाले, अन्नपूर्णा शुगर हा गूळ पावडर उत्पादन करणारा प्रकल्प आहे. प्रकल्पाला इथेनॉल, स्पिरिट अथवा अन्य उपपदार्थ निर्मितीची परवानगी नाही. त्यामुळे पारंपरिक कारखान्यांपेक्षा या प्रकल्पाची कार्यपद्धती वेगळी आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना, अन्य शेतकरी संघटना, शासन व कारखानदार यांच्यात चर्चेनंतर ऊसदराचा जो अंतिम निर्णय होईल, त्यानुसार दर देण्यास बांधील आहोत. ‘गोकुळ’चे माजी संचालक अबंरिष घाटगे, एम. बी. पाटील, के. के. पाटील, आदी उपस्थित होते.


















