जकार्ता: भारतीय दुचाकी वाहन निर्माता कंपनी टीव्हीएस मोटर कंपनी इंडोनेशियातील उत्पादन क्षमता वाढवण्याच्या तयारीत आहे. कंपनी इंडोनेशियात नवीन किंवा विस्तारित उत्पादन प्रकल्प उभारण्यासोबतच इलेक्ट्रिक आणि इथेनॉलवर चालणाऱ्या मोटारसायकली विकसित करण्याचा विचार करत असल्याचे इंडोनेशिया बिझनेसपोस्टने वृत्त दिले आहे.भारतीय वाहन उत्पादक कंपनीने 17 सप्टेंबर रोजी जकार्ता येथील मर्डेका पॅलेसमध्ये झालेल्या बैठकीदरम्यान इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यांच्यासोबत गुंतवणूक आणि विस्ताराच्या योजनांवर चर्चा केली. या बैठकीला गुंतवणूक आणि डाउनस्ट्रीमिंग मंत्री तसेच इन्व्हेस्टमेंट कोऑर्डिनेटिंग बोर्ड (BKPM) चे अध्यक्ष रोसन रोएस्लानी हेदेखील उपस्थित होते.
टीव्हीएस मोटरकडून इंडोनेशियात यापूर्वीच मोटारसायकली, स्कूटर आणि तीनचाकी वाहनांचे उत्पादन केले जाते. प्रस्तावित विस्तारामुळे कंपनीची उत्पादन क्षमता आणखी वाढणार असून, त्यामध्ये इलेक्ट्रिक आणि इथेनॉलवर चालणाऱ्या दुचाकींच्या तंत्रज्ञानाचा समावेश केला जाणार आहे. राष्ट्राध्यक्षांच्या सचिवालयाच्या प्रेस, मीडिया आणि माहिती विभागाने जारी केलेल्या निवेदनात रोसन रोएस्लानी म्हणाले, “टीव्हीएसला आपला कारखाना विस्तारायचा आहे. मात्र, कंपनीचा भर केवळ इलेक्ट्रिक वाहनांवर आधारित इंधनावर राहणार नाही; ती इथेनॉल इंधनाचा वापरही सुरू करणार आहे.”
या बैठकीत टीव्हीएसला इंडोनेशियातील आपल्या विकास योजनांचे सादरीकरण करण्याची तसेच भविष्यातील सहकार्याच्या संभाव्य क्षेत्रांवर चर्चा करण्याची संधी मिळाली. रोसन रोएस्लानी यांनी टीव्हीएसच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीचे वर्णन सदिच्छा भेट म्हणून केले.प्रस्तावित सहकार्यामध्ये इलेक्ट्रिक आणि इथेनॉलवर चालणाऱ्या मोटारसायकलींच्या विकासाचा समावेश असेल. या तंत्रज्ञानाच्या विकासासाठी संबंधित सरकारी मंत्रालये आणि संशोधन पथकांकडून आवश्यक सहकार्य दिले जाण्याची अपेक्षा असल्याचे रोसन रोएस्लानी यांनी सांगितले.


















