अहिल्यानगर : कोपरगावमध्ये अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईत निकृष्ट गुळाचा मोठा साठा जप्त

अहिल्यानगर : अन्न व औषध प्रशासनाने कोपरगाव तालुक्यात दोन ठिकाणी शुक्रवारी (दि. १८) कारवाई केली. या कारवाईत ३.६० लाख रुपये किमतीचा निकृष्ट गूळ व तुपाचा साठा जप्त करण्यात आला. संबंधित अन्नपदार्थाचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात येणार आहेत. कोपरगाव येथील मे. कांतिलाल हरलाल जोशी, कोपरगाव यांच्या आस्थापनेवर कारवाई करण्यात आली. यावेळी २,१४९ किलो गूळ आढळून आला. त्याची किंमत १ लाख १८ हजार १९५ रुपये आहे. या गुळाची साठवणूक अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार निर्धारित पद्धतीने नसल्याचे आढळून आले, तसेच हा गूळ निकृष्ट दर्जाचा असल्याचा संशय असल्याने त्याचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आणि संबंधित साठा जप्त करण्यात आला.

अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे, नाशिक विभागाचे संयुक्त आयुक्त एम. यू. माने आणि अन्न विभागाच्या सहायक आयुक्त ए. ए. भोईटे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. आणखी एक कारवाई पोहेगाव येथील माजी आमदार के. बी. रोहमारे दूध शीतकरण केंद्रावर करण्यात आली. या ठिकाणी गावरान गायीचे तूप १४९.२ किलो, तसेच सुटे तूप ९९.२ किलो, असा तुपाचा साठा आढळला. या साठ्याची किंमत २ लाख ११ हजार १४० रुपये आहे. तूप निकृष्ट दर्जाचे असल्याचा संशय असल्याने नमुने तपासणी व विश्लेषणासाठी घेण्यात आले. या दोन्ही कारवाया अन्न सुरक्षा अधिकारी किरण जगदाळे यांनी सहायक आयुक्त ए. ए. भोईटे यांच्या समवेत केल्या.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here