सांगली : एकरी विक्रमी ऊस उत्पादन घेत मेहनत, शास्त्रीय नियोजन, आधुनिक तंत्रज्ञान आणि प्रयोगशील शेतीचा आदर्श निर्माण करणाऱ्या डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील सात ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा ‘डॉ. पतंगराव कदम ऊस भूषण’ पुरस्काराने गौरव करण्यात आला. कारखान्याच्या ३३व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आमदार डॉ. विश्वजित कदम यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.
कारखान्याचे संस्थापक आमदार डॉ. पतंगराव कदम यांच्या स्मरणार्थ हे पुरस्कार दिले जातात. ऊस उत्पादकांनी एकरी उत्पादन वाढवावे, आधुनिक तंत्रज्ञान आणि शास्त्रीय शेती पद्धतींचा अवलंब करावा तसेच विविध प्रयोगांच्या माध्यमातून विक्रमी उत्पादन साध्य करावे, या उद्देशाने आमदार डॉ. विश्वजित कदम यांच्या संकल्पनेतून ऊस पीक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
सन २०२५-२६ मध्ये झालेल्या या स्पर्धेत नियम व अटींची पूर्तता करून सर्वाधिक एकरी उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. आडसाली, सुरू हंगाम आणि खोडवा या तीन गटांत शेतकऱ्यांनी उल्लेखनीय उत्पादन नोंदविले. या प्रयोगशील शेतकऱ्यांच्या यशामुळे परिसरातील अन्य ऊस उत्पादकांनाही उत्पादनवाढीसाठी नवी दिशा मिळाली आहे.
आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी सातत्यपूर्ण मेहनत, योग्य नियोजन, आधुनिक तंत्रज्ञान आणि शास्त्रीय पद्धतींचा अवलंब करून विक्रमी उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचे कौतुक केले. प्रयोगशील शेतकऱ्यांच्या अनुभवातून इतर ऊस उत्पादकांना प्रेरणा मिळते, असे त्यांनी सांगितले.
यावेळी कारखान्याचे अध्यक्ष तथा माजी आमदार मोहनराव कदम, संचालक शांताराम कदम, सभापती डॉ. जितेश कदम, हर्षवर्धन कदम, उपाध्यक्ष तानाजी शिंदे, सर्व संचालक तसेच कार्यकारी संचालक एस. एल. देसाई उपस्थित होते.
‘या’ शेतकऱ्यांचा झाला गौरव
आडसाली गट : चिंचणीचे दिनकर व्यंकू महाडिक यांनी प्रथम, देवराष्ट्रेचे दीपक मनोहर शिंदे यांनी द्वितीय, तर उपाळे-मायणीचे विनायक प्रल्हाद कदम यांनी तृतीय क्रमांक मिळविला.
सुरू हंगाम गट : सासपडेचे लक्ष्मण बाबुराव पोळ यांनी प्रथम, शिरसगावचे अरुण शंकर मांडके यांनी द्वितीय, तर विहापूरचे भगवान महादेव नांगरे यांनी तृतीय क्रमांक पटकावला.
खोडवा गट : खेराडे-विटा येथील बबन दादू महाडिक यांनी प्रथम क्रमांक मिळविला.


















