उसाच्या पक्वतेची चाचणी करूनच तोडणी कार्यक्रम राबविण्याची कृषीतज्ज्ञांची शिफारस

पुणे : महाराष्ट्रातील साखर उद्योग आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थैर्यासाठी अपरिपक्व उसाची तोडणी थांबवणे अत्यंत गरजेचे आहे. अपरिपक्व तोडणीमुळे उसाचे वजन, रसातील सुक्रोजचे प्रमाण आणि साखर उतारा या सर्वांवरच विपरीत परिणाम होऊन शेतकरी व साखर कारखाने या दोघांचेही मोठे आर्थिक नुकसान होते. त्यामुळे शास्त्रीय पद्धतीने ऊस तोडणी कार्यक्रम राबवून पक्वतेची (ब्रिक्स) चाचणी करून, ऊस जातींनुसार आणि लागवडीच्या तारखेनुसार नियोजित ऊस तोडणी कार्यक्रम राबवणे काळाची गरज आहे. राज्यातील साखर कारखान्यांची वाढती गळीत क्षमता आणि ऊस क्षेत्र वाढविण्यावर असणाऱ्या मर्यादा यामुळे भविष्यात अपरिपक्व ऊस दोघानांही फायदेशीर ठरणारे नाही. यासाठी नजीकच्या काळामध्ये ऊस विकासावर भर देऊन उपाययोजना करणे साखर उद्योगास संजीवनी देणारे ठरेल असे मत वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या ऊस प्रजनन विभागातील प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. जुगलकिशोर रेपाळे यांनी म्हटले आहे. तोडणी कार्यक्रमामध्ये सुरुवातीस साखर उताऱ्यानुसार तोडणीमध्ये प्रथम खोडवा क्षेत्र आणि लागवड क्षेत्र अंदाजे ४०:६० प्रमाणात असावे. यामध्ये प्रामुख्याने लवकर पक्य होण्याचा ऊस जातींना प्राधान्य द्यावे, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.

डॉ. रेपाळे यांच्या म्हणण्यानुसार, अपरिपक्व ऊस तोडणीमुळे उत्पादन घटते. उसामध्ये प्रति महिना २ ते २.५ कांड्या तयार होत असतात. जर दोन ते तीन महिने ऊस लवकर तोडल्यास ६ ते ८ कांड्या कमी येतात. यामुळे उत्पादनात मोठी घट येऊन आर्थिक नुकसान होते. अपरिपक्व उसामध्ये साखरेचे (सुक्रोज) संचयन पूर्ण झालेले नसल्यामुळे ऊस गुणवत्ता, उत्पादन व साखर उतारा यावर परिणाम होतो. साखर तयार करण्याच्या प्रक्रियेमध्ये सुक्रोज फॉस्फेट सिंथेस हा विकर महत्त्वाचा आहे. ऊस परिपक्वतेदरम्यान त्याची क्रिया वाढते. कारखान्यांमध्ये अपरिपक्व ऊस तोडणीमुळे साखरेचे स्फटिकीकरण कमी होऊन मळीचे प्रमाण वाढते. यामुळे साखर उताऱ्यात घट होऊन उत्पादन खर्चात वाढ झाल्यामुळे आर्थिक नफ्याचे प्रमाण घटते. यासाठी साखर कारखान्यांनी साखर उतारा आणि त्याचबरोबर ऊस उत्पादन वाढीसाठी अपरिपक्व ऊस तोडणी टाळण्यासाठी उपाय योजना राबविल्यास शेतकरी आणि साखर कारखान्यांना आर्थिक लाभ मिळविता येईल. यासाठी ऊस विकासाचा सर्वांगीण आराखडा तयार करणे, जातिनिहाय आणि हंगामवार ऊस लागवड कार्यक्रम राबविणे, योग्य पक्वता असलेल्या उसाची तोडणी करणे आवश्यक आहे.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here