बेळगाव : काकती येथील मार्कंडेय साखर कारखान्यांची सर्वसाधारण सभा गुरुवारी (ता. २४) झाली. अविनाश पोतदार अध्यक्षस्थानी होते. बैठकीला उपाध्यक्ष बसवंत मायाण्णाचे, कार्यकारी संचालक एम. डी. झुबीउल्ला, आर. आय. पाटील आदी उपस्थित होते. कारखाना पुन्हा सुरू करण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची प्रक्रिया सुरू असून त्यातील महत्त्वाच्या बाबींवरही बैठकीत चर्चा झाली. कारखाना दहा वर्षांच्या लीजवर देण्याबाबत बैठकीत निर्णय झाला. सध्या कारखाना सुरू करण्याच्या दृष्टीने प्राथमिक स्वरूपातील कामे सुरू आहेत. सुमारे ६० स्थानिक कामगार सध्या कामावर असून कारखान्याचे काम पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासाठी आणखी १०० कामगारांची नियुक्ती करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या उसाचे बिल वेळेवर देण्यात येईल, अशी ग्वाही यावेळी पदाधिकाऱ्यांतर्फे देण्यात आली.
कारखान्याचे कार्यकारी संचालक झबीउल्ला यांनी स्वागत केले. नोव्हेंबरअखेर कारखान्याची धुरांडी पेटविण्याचा निर्णय घेण्यात आला. नोव्हेंबरअखेर गाळप हंगाम सुरू करण्याचे उद्दिष्ट ठेवले असल्याची माहिती देण्यात आली. कारखान्याच्या ताब्यात सुमारे ११३ एकर जमीन आहे. यापूर्वी या जमिनीसाठी ३० वर्षांचा करार केला होता. संबंधित जमिनीची लीज यावर्षी संपली आहे. त्यामुळे लीजचा कालावधी वाढवून घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केली जाणार आहे. आगामी चार ते आठ दिवसांत निधी उपलब्ध झाल्यानंतर दुरुस्ती कामाला वेगाने चालना मिळणार आहे. मनोहर हुक्केरीकर, मनोज पावशे, अण्णू कटांबळे, आर. आय. पाटील, यल्लाप्पा बेळगावकर, भरत शानभाग, चेतक कांबळे आदी उपस्थित होते. सुनील अष्टेकर यांनी सूत्रसंचालन केले.


















