बेळगाव : बेळगाव तालुक्यातील एकमेव सहकारी साखर कारखाना असलेल्या काकती येथील मार्कंडेय सहकारी साखर कारखान्याचे भवितव्य अखेर निश्चित झाले आहे. कारखाना लीजवर देण्याच्या हालचाली सुरू असतानाच संचालक मंडळाने शेतकऱ्यांच्या हितासाठी कारखाना सहकारी तत्त्वावरच पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मार्कंडेय सहकारी साखर कारखान्याची सर्वसाधारण सभा गुरुवारी (दि. २४) रामभाऊ पोतदार नगरी येथे झाली. यावेळी कारखाना लीजवर देण्याच्या प्रस्तावासह विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
गावोगावी जाऊन भागभांडवल केले जमा
रामभाऊ पोतदार, गुरुअण्णा कुद्रे, शट्टपाण्णा पाटील, गंगाधर शानभाग आणि यल्लोजी पिंगट यांनी बेळगाव तालुक्यात शेतकऱ्यांच्या हक्कासाठी सहकारी तत्त्वावर साखर कारखाना उभारण्याचा पुढाकार घेतला होता. त्यांनी गावोगावी जाऊन भागभांडवल जमा केले. त्यांच्या प्रयत्नांतून सरकारकडून ११३ एकर जमीन मिळाली आणि कारखान्याची उभारणी करण्यात आली.माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्या हस्ते २०१९ मध्ये कारखान्याच्या पहिल्या गाळप हंगामाला सुरुवात झाली. त्यानंतर २०२३ पर्यंत कारखान्याचे कामकाज सुरळीत सुरू होते. मात्र, आर्थिक संकटामुळे त्यानंतर कारखाना सलग दोन वर्षे बंद ठेवावा लागला.
लीज देण्याच्या निर्णयाला विरोध
कारखाना लीजवर देण्याच्या हालचाली सुरू झाल्यानंतर काही संचालक आणि सभासदांनी त्याला विरोध केला. कारखाना लीजवर दिल्यास शेतकऱ्यांचे हित आणि सहकारी संस्थेचा मूळ उद्देश साध्य होणार नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली.माजी अध्यक्ष अविनाश पोतदार यांच्या पुढाकाराने बंद असलेला मार्कंडेय साखर कारखाना पुन्हा सहकारी तत्त्वावर सुरू करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. कारखाना लीजवर दिला जाणार नाही, यावर व्यवस्थापकीय संचालक झुबिउल्ला के. आणि माजी अध्यक्ष अविनाश पोतदार यांनी स्पष्ट भूमिका घेतली. शेतकऱ्यांच्या हितासाठी कारखाना सहकारी तत्त्वावरच चालविणे आवश्यक असल्याचे झुबिउल्ला यांनी सांगितले.
घाळी कंपनीकडून आर्थिक सहकार्याची तयारी
मार्कंडेय सहकारी साखर कारखाना पुन्हा सुरू करण्यासाठी पी. जी. घाळी कंपनीने पुढाकार घेतला आहे. अविनाश पोतदार यांच्या प्रयत्नांमुळे कंपनीने कारखान्याला आर्थिक सहकार्य करण्याची तयारी दर्शविली आहे.शेतकऱ्यांच्या मालकीचा हा कारखाना शेतकऱ्यांकडेच राहावा, यासाठी कंपनीकडून आवश्यक सहकार्य केले जाईल, असे कंपनीकडून सांगण्यात आले.
११३ एकर जमीन कारखान्याच्या नावे होण्याची प्रतीक्षा
काकती येथे वन विभागाच्या जमिनीवर मार्कंडेय सहकारी साखर कारखान्याची उभारणी करण्यात आली आहे. दरम्यान, कारखान्याने खानापूर तालुक्यातील आमगाव येथील आपली जागा वन विभागाकडे हस्तांतरित केली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी आदेश जारी केला आहे. आता काकती येथील ११३ एकर जमीन कारखान्याच्या नावे करण्यासाठी संचालक मंडळाकडून प्रयत्न सुरू आहेत. ही जमीन कारखान्याच्या नावे झाल्यास बंद असलेल्या मार्कंडेय कारखान्याला मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.


















