बेळगाव : ऊसदराचा तिढा कायम असतानाच गळीत हंगामाला वेग; हंगाम ८० ते १०० दिवसांचाच राहण्याचा अंदाज

बेळगाव : यंदाच्या हंगामात ऊसदरावरून निर्माण झालेला संभ्रम आणि शेतकऱ्यांमधील नाराजी कायम असतानाच निपाणी तालुक्यात ऊसतोडणीला वेग आला आहे. साखर कारखानेही पूर्ण क्षमतेने सुरू झाले असून, यंदाचा गळीत हंगाम अवघ्या ८० ते १०० दिवसांपर्यंतच चालण्याचा अंदाज ऊस उत्पादक शेतकरी व्यक्त करत आहेत. दराचा प्रश्न, वाढता उत्पादन खर्च आणि दुष्काळसदृश परिस्थिती यामुळे ऊस उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.

निपाणी तालुक्यात साधारण २२ हजार हेक्टर क्षेत्रावर उसाचे पीक घेतले जाते. हा ऊस बहुराज्य नोंदणीच्या माध्यमातून विविध साखर कारखान्यांकडे गाळपासाठी पाठविला जात आहे. यंदा ऊसदरावरून महिनाभर अस्वस्थता आणि संभ्रमाचे वातावरण होते. जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी प्रतिटन ३,६०० रुपयांच्या दरात फारसा बदल होण्याची शक्यता नसल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, साखरेच्या विक्री दरात वाढ झाल्यास त्याचा लाभ ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळू शकतो, अशी शासनाची भूमिका आहे.दरम्यान, विविध साखर कारखान्यांनी वेगवेगळे दर जाहीर करण्यास सुरुवात केली असून, अधिकाधिक ऊस आपल्या कारखान्याकडे वळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

ChiniMandi WhatsApp Channel

पश्चिम महाराष्ट्रातील दर अधिक; सीमाभागातील शेतकऱ्यांची कोंडी

कर्नाटक सीमाभागातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखान्यांकडून चांगल्या दराची अपेक्षा होती. मात्र, यंदा जाहीर होणाऱ्या दरांमध्ये मोठी तफावत दिसून येत आहे.कोल्हापूर विभागात प्रतिटन ३,९०० ते ४,२०० रुपये, सांगली-सातारा विभागात ३,५०० ते ३,९०० रुपये, तर पुणे विभागात साधारण ३,५०० रुपयांच्या आसपास दर जाहीर होत आहेत. त्यामुळे मिळणारा ऊसदर आणि उत्पादनासाठी झालेला खर्च यांचा ताळमेळ कसा साधायचा, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे.एकीकडे ऊसदराचा तिढा कायम आहे, तर दुसरीकडे शेतात उभा असलेला ऊस वेळेत कारखान्याला पाठविण्याची शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे.

पुढील हंगामासाठी ऊस लागवडीचा उत्साहही मंदावला

यंदा दुष्काळसदृश परिस्थिती आणि ऊसदराचा निर्माण झालेला प्रश्न यामुळे पुढील गळीत हंगामासाठी नवीन ऊस लागवडीचा वेग मंदावला आहे.पाण्याची उपलब्धता, वाढता मशागत खर्च, खते, औषधे आणि मजुरीचे वाढलेले दर यामुळे शेतकरी नवीन लागवड करताना सावध भूमिका घेत आहेत. सध्याच्या परिस्थितीत ऊस उत्पादन आर्थिकदृष्ट्या परवडणार का, याबाबतही शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.

हालसिद्धनाथ कारखान्याची पहिली उचल ३,८०० रुपये जाहीर

दरम्यान, हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याने यंदाच्या गळीत हंगामासाठी ऊस उत्पादकांना दिलासा देणारी घोषणा केली आहे. कारखान्याने यापूर्वी प्रतिटन ३,७७० रुपये दर जाहीर केला होता. त्यामध्ये आणखी ३० रुपयांची वाढ करून पहिली उचल प्रतिटन ३,८०० रुपये देण्याचे जाहीर करण्यात आले आहे.कारखान्याचे मार्गदर्शक तथा जिल्हा बँकेचे अध्यक्ष अण्णासाहेब जोल्ले यांनी ही घोषणा केली. तसेच साखरेच्या सरासरी विक्री दरानुसार शेतकऱ्यांना अतिरिक्त रक्कम देण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

साखरेच्या विक्री दरानुसार अतिरिक्त रक्कम मिळणार

अण्णासाहेब जोल्ले यांनी जाहीर केलेल्या निर्णयानुसार, हंगामातील साखरेचा सरासरी विक्री दर प्रतिकिलो ५० रुपये झाल्यास शेतकऱ्यांना प्रतिटन अतिरिक्त २०० रुपये, तर साखरेचा दर ५५ रुपये झाल्यास प्रतिटन ४०० रुपये अतिरिक्त मिळणार आहेत.याशिवाय, हंगामातील अंतिम सरासरी साखर उतारा ११.५० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक राहिल्यास प्रतिटन आणखी १०० रुपये देण्यात येणार आहेत. त्यामुळे साखरेच्या बाजारभावात वाढ आणि साखर उताऱ्यात सुधारणा झाल्यास ऊस उत्पादकांना जाहीर केलेल्या पहिल्या उचलीपेक्षा अधिक रक्कम मिळू शकणार आहे.

शेतकरी हिताचा निर्णय घेतल्यामुळे परिसरातील सर्व ऊस उत्पादकांनी जास्तीत जास्त ऊस हालसिद्धनाथ कारखान्याकडे पाठवून सहकार्य करावे, असे आवाहन जोल्ले यांनी केले.यावेळी कारखान्याचे अध्यक्ष जयकुमार खोत, संचालक एम. पी. पाटील, अविनाश पाटील, पवन पाटील, प्रकाश शिंदे, रमेश पाटील, जयवंत भाटले, राजू गुंदेशा, श्रीकांत बन्ने, विनायक पाटील, सुहास गुमणे, रावसाहेब फराळे, महालिंग कोटीवाले, राजेंद्र कानडे, डॉ. सुदर्शन मुराबट्टे, रणजित माने आणि किरण निकाडे उपस्थित होते.

ऊसदर आणि उत्पादन खर्चाचे गणित जुळणार कसे?

गळीत हंगामाला वेग आला असला, तरी ऊसदराचा प्रश्न अद्याप पूर्णपणे सुटलेला नाही. एका बाजूला कारखाने ऊस मिळविण्यासाठी दर जाहीर करत आहेत, तर दुसऱ्या बाजूला वाढत्या उत्पादन खर्चामुळे शेतकऱ्यांना समाधानकारक दराची अपेक्षा आहे. पुढील हंगामातील ऊस लागवडीवरही या परिस्थितीचा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांना प्रत्यक्षात किती दर मिळतो आणि ऊस शेती कितपत परवडते, याकडे सीमाभागातील ऊस उत्पादकांचे लक्ष लागले आहे.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here