पुणे : यशवंत कारखान्याच्या वार्षिक सभेत गदारोळ; जमीन विक्रीसह थकीत देण्यांचा विषय गाजला

पुणे : थेऊर (ता. हवेली) येथील श्री चिंतामणी यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आर्थिक ताळेबंदातील तफावत, जमीन विक्री आणि थकीत देण्यांवरून जोरदार चर्चा झाली. सुमारे तीन तास चाललेल्या सभेअखेर सभासदांनी संचालक मंडळाच्या पाठीशी उभे राहत विषयपत्रिकेवरील सर्व १६ विषयांना बहुमताने मंजुरी दिली. अध्यक्ष सुभाष जगताप यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत सभासद राजेंद्र रतन चौधरी यांनी २०२४-२५ व २०२५-२६च्या आर्थिक ताळेबंदात सुमारे १५ कोटी रुपयांची तफावत असल्याचा आरोप केला. यावर प्रशासकाच्या काळातील नफा-तोटा पत्रके उपलब्ध नसल्याने आणि जुनी पत्रके अद्ययावत नसल्यामुळे ही चूक झाली असून ती दुरुस्त करण्यात येईल, असे अध्यक्षांनी स्पष्ट केले.

प्रशांत काळभोर यांनी भागभांडवल उभारणीच्या विषयावर ४९.१८ एकर जमीन विकल्यानंतर उर्वरित ५० एकर जमीन विकून सुमारे २९९ कोटी रुपये उभारण्याचा प्रस्ताव असताना १०० कोटी रुपयांच्या कर्जाची गरज काय, असा सवाल केला. भरत कुंजीर व पांडुरंग काळे यांनी २०१०-११पासून थकीत शेतकरी व कामगारांची देणी व्याजासहित अदा करण्याची मागणी केली. दरम्यान, कारखान्याच्या उर्वरित ५० एकर जमिनीच्या विक्रीसाठी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून परवानगी घेण्याचे अधिकार संचालक मंडळाला देण्यात आले. कारखाना पुन्हा सुरू करण्यासाठी आधुनिक क्षमतेचा प्लांट उभारण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. सभेला सभासद, संचालक, अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here