सांगली : वाळवा तालुक्यातील कोळे नरसिंहपूर येथील ढेले मळा वस्तीमध्ये शेतातील ऊस तोडणीवरून झालेल्या वादातून दोन महिलांवर कोयत्याने वार करून त्यांना जखमी करण्यात आले. तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी तिघांविरोधात ईश्वरपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रुपाली मंडले यांनी याबाबत पोलिसांत फिर्याद दिली.रमेश राजाराम कांबळे (वय ४९), संगीता राजाराम कांबळे (वय ४८) आणि नीलम रमेश कांबळे (वय ३९) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बेरडमाची (ता. वाळवा) येथील रुपाली अनिल मंडले (वय ३६) या गहाण खरेदीखत केलेल्या शेतातील ऊस तोडण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी कोळे नरसिंहपूर येथील ढेले मळा वस्तीतील रमेश, संगीता आणि नीलम कांबळे यांनी ऊस तोडणीस विरोध केला.यावेळी झालेल्या वादातून रमेश कांबळे यांनी रुपाली मंडले यांना ढकलून दिले. त्यानंतर संगीता कांबळे हिने सुप्रिया मंडले यांच्या डाव्या हातावर कोयत्याने वार करून त्यांना जखमी केले. तर नीलम कांबळे हिने रुपाली मंडले यांच्या आत्या मंगल मदने यांच्या उजव्या हातावर कोयत्याने वार करून दुखापत केली.
दरम्यान, नीलम कांबळे हिने ‘तुमच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करू,’ अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. तसेच रुपाली मंडले यांच्या पती अनिल शिवाजी मंडले यांना ‘तुमचे मुंडके तोडून रानात पाडीन,’ अशी जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी ईश्वरपूर पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.


















