पुणे : वीजवाहक तारांच्या घर्षणाने साडेआठ एकर ऊस जळून खाक; शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान

पुणे : आंबेगाव तालुक्यातील काठापूर बुद्रुक येथील भोकरवाडी-लिंगाळी परिसरात वीजवाहक तारांच्या घर्षणामुळे सोमवारी (दि. २८) दुपारी आग लागली. या आगीत सुमारे साडेआठ एकर ऊस जळून खाक झाला. या घटनेत चार शेतकऱ्यांचे अंदाजे आठ ते दहा लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती आहे. नुकसानीचा पंचनामा करून शेतकऱ्यांना भरपाई देण्यात यावी, अशी मागणी सरपंच अशोक करंडे यांनी केली आहे.

काठापूर बुद्रुक येथील भोकरवाडी-लिंगाळी परिसरात आशा शांताराम घुले, विवेक घुले, अंजली घुले आणि विजया घुले या शेतकऱ्यांची शेती आहे. या शेतांमध्ये मागील वर्षी उसाची लागवड करण्यात आली होती. सध्या ऊस पूर्ण वाढीला आला असून कारखाने सुरू झाल्यानंतर त्याची तोडणी होणार होती.मात्र, वीजवाहक तारांच्या घर्षणामुळे ठिणगी पडून ऊसाच्या शेताला आग लागली. काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण केल्याने साडेआठ एकर क्षेत्रातील तोडणीला आलेला ऊस जळून खाक झाला. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

ChiniMandi WhatsApp Channel

या क्षेत्रातून एकरी सुमारे ७० ते ८० टन ऊस उत्पादन अपेक्षित होते. त्यानुसार सुमारे ५५० ते ६०० टन ऊस जळाल्याचा अंदाज आहे. ऊसतोडणीचा हंगाम अद्याप सुरू झालेला नसून कारखाने सुरू होण्यास आणखी १५ ते २० दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे जळालेला ऊस वाळून गेल्यास शेतकऱ्यांचे नुकसान आणखी वाढण्याची शक्यता आहे. या आगीत शेतकऱ्यांचे दहा लाख रुपयांपेक्षा अधिक नुकसान झाल्याचे भीमाशंकर कारखान्याचे संचालक बाळासाहेब घुले यांनी सांगितले. संबंधित विभागाने तातडीने नुकसानीचा पंचनामा करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here