कोल्हापूर: सांगरूळमध्ये भीषण आग; ३० एकरांतील ऊस जळून खाक, २५ ते ३० शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान

कोल्हापूर: करवीर तालुक्यातील सांगरूळ येथे लागलेल्या भीषण आगीत सुमारे ३० एकरांतील ऊस जळून खाक झाला. या दुर्घटनेत २५ ते ३० शेतकऱ्यांचे अंदाजे २५ ते ३० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. वाऱ्याचा वेग अधिक असल्याने आगीने काही क्षणांतच परिसरातील ऊसशेतीला विळखा घातला.

सांगरूळ येथील कळंब पाणंद आणि माळ परिसरातील शेतांमध्ये आज दुपारी दोनच्या सुमारास अचानक आग लागली. महेश वातकर यांच्यासह अन्य शेतकऱ्यांच्या शेतातून महावितरणच्या शेतीपंपांना वीजपुरवठा करणारी विद्युत वाहिनी गेली आहे. ही वाहिनी उसाला घासल्याने आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

ChiniMandi WhatsApp Channel

आग लागल्यानंतर जोरदार वाऱ्यामुळे काही क्षणांतच आगीचा भडका उडाला आणि आसपासच्या ऊसशेतांमध्ये ती वेगाने पसरली. पाहता पाहता सुमारे ३० एकरांतील ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. घटनेची माहिती मिळताच परिसरातील शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न केले. काही शेतकऱ्यांनी नदीकाठावरील शेतीपंप सुरू करून पाण्याचा मारा केला, तर काहींनी ऊस तोडून आगीचा फैलाव रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, आगीची तीव्रता आणि वाऱ्याचा वेग अधिक असल्याने हे प्रयत्न अपुरे ठरले.

ऊस गाळप हंगामाच्या सुरुवातीलाच ही दुर्घटना घडल्याने बाधित शेतकऱ्यांसमोर मोठे आर्थिक संकट निर्माण झाले आहे. दरम्यान, तलाठी प्रकाश सूर्यवंशी, सहायक कृषी अधिकारी उमा गुरव, कुंभी कारखान्याचे संचालक राहुल खाडे आणि विलास आसगावकर यांनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानीची पाहणी केली.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here