सोलापूर : दुष्काळग्रस्तांच्या मदतीला सिद्धेश्वर कारखाना सरसारवला, मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत

सोलापूर : श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या ५४ व्या गळीत हंगामाचे बॉयलर अग्निप्रदीपन रविवारी झाले. होमहवन करण्याचा मान संचालक महादेव जम्मा व त्यांच्या पत्नी शोभा जम्मा यांना मिळाला. त्यानंतर अध्यक्ष पुष्पराज ऊर्फ अण्णाराज काडादी व त्यांच्या पत्नी तेजश्री काडादी, उपाध्यक्ष सिद्धाराम चाकोते व जम्मा दाम्पत्य यांच्या हस्ते बॉयलर अग्निप्रदीपन करण्यात आले. यावेळी कारखान्याचे मार्गदर्शक संचालक धर्मराज काडादी यांनी यंदा दुष्काळाची तीव्रता जास्त जाणवण्याची शक्यता असल्याने मुख्यमंत्री दुष्काळ सहाय्यता निधीसाठी श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना आणि श्री सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीच्या वतीने प्रत्येकी २५ लाख रुपये मदत देण्याची घोषणा केली.

धर्मराज काडादी यांनी सांगितले की, आजूबाजूच्या कारखान्यांमधील स्पर्धा तसेच पाण्याची टंचाई ही शेतकऱ्यांची समस्या लक्षात घेऊन यंदाचा गाळप हंगाम लवकर सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. मागील दोन हंगामांत गाळप कमी झाल्याने कारखान्याला मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले. त्यामुळे काही शेतकऱ्यांची ऊसबिले देण्यास विलंब झाला. शासनाने गेल्या वर्षीच्या ‘एफआरपी’ पोटी कारखान्यांना प्रतिटन ३५० रुपये देण्यासाठी सॉफ्ट लोनची सुविधा उपलब्ध केली आहे. ऑक्टोबरअखेर शेतकऱ्यांची बिले देण्याचा प्रयत्न सुरू आहे. कारखान्याने आजपर्यंत इतर कारखान्यांच्या तुलनेत प्रतिटन १०० रुपये अधिकचा दर दिला आहे. कारखान्याच्या कामगारांना दिवाळीनिमित्त एक पगार व बोनस देण्यात येणार आहे. तसेच कामगारांना कारखान्याच्या ग्राहक भांडारातून सेवा सुरू राहणार असून, कामगारांचे हुद्दे, पगारवाढीचा विषयही लवकरच मार्गी लावण्याचे आश्वासन असल्याचे काडादी यांनी दिले. कार्यकारी संचालक एम. बी. अथणी यांनी स्वागत केले. सिद्धाराम बबलेश्वर यांनी सूत्रसंचालन केले.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here