गूळ उद्योगाला मिळणार कायद्याचे कवच; हिवाळी अधिवेशनात स्वतंत्र कायदा आणण्याची तयारी

पुणे : गूळ आणि खांडसरी उद्योगाला स्वतंत्र कायदेशीर चौकटीत आणण्यासाठीच्या प्रक्रियेला आता वेग आला आहे. साखर आयुक्तालयाने तयार केलेल्या कायद्याच्या मसुद्यात सरकारने सुचविलेल्या दुरुस्तीनुसार सुधारित मसुदा पुन्हा सरकारकडे सादर करण्यात येणार आहे. हा मसुदा प्राप्त झाल्यानंतर महिनाभरात त्यावर निर्णय घेण्याचे निर्देश मंत्री समितीने दिले आहेत. आगामी हिवाळी अधिवेशनात गूळ उद्योगासाठी स्वतंत्र कायदा करण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे.

गूळ उद्योगाला स्वतंत्र कायदेशीर चौकट मिळण्याची शक्यता

ChiniMandi WhatsApp Channel

दैनिक सकाळमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तात म्हटले आहे कि, पारंपरिक गुऱ्हाळांपासून मोठ्या औद्योगिक प्रकल्पांपर्यंत विस्तारलेल्या गूळ उद्योगाला प्रथमच स्वतंत्र कायदेशीर चौकट मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित असलेल्या गूळ उद्योगाच्या नियमनाचा प्रश्न आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. साखर आयुक्तालयाने यापूर्वी स्वतंत्र कायद्याचा मसुदा तयार करून सरकारकडे सादर केला होता. सरकारने त्यामध्ये काही बदल आणि दुरुस्त्या सुचवून तो मसुदा पुन्हा आयुक्तालयाकडे पाठविला. त्यानुसार सुधारित मसुदा तयार करण्याचे काम सुरू असून, तो सरकारला सादर झाल्यानंतर महिनाभरात निर्णय घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

गुऱ्हाळ उद्योग आता औद्योगिक स्वरूपात

गूळ उत्पादनाचा व्यवसाय गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर विस्तारला आहे. पूर्वी शेतकरी स्वतःच्या किंवा आसपासच्या शेतकऱ्यांकडून ऊस घेऊन पारंपरिक गुऱ्हाळांमध्ये गूळ तयार करीत होते. मात्र, आता या व्यवसायाला मोठ्या प्रमाणावर व्यावसायिक आणि औद्योगिक स्वरूप आले आहे.राज्यात प्रतिदिन शेकडो टन उसाचे गाळप करणारे गूळ उत्पादन प्रकल्प सुरू झाले आहेत. पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यासह कोल्हापूर जिल्ह्यात गूळ उत्पादन मोठ्या प्रमाणावर केले जाते. त्यामुळे या उद्योगासाठी स्वतंत्र नियम आणि नियंत्रण यंत्रणा असण्याची गरज निर्माण झाली आहे.

चार-पाच वर्षांपासून कायद्याची चर्चा

गूळ उद्योगाला स्वतंत्र कायद्याच्या चौकटीत आणण्याची मागणी गेल्या चार-पाच वर्षांपासून होत आहे. पारंपरिक गुऱ्हाळांच्या तुलनेत मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करून गूळ उत्पादन करणाऱ्या प्रकल्पांची संख्या वाढत असल्याने या क्षेत्राच्या नियमनासाठी स्वतंत्र कायद्याची गरज अधोरेखित झाली होती.आता सुधारित मसुद्यावर महिनाभरात निर्णय घेण्याचे आणि त्यानंतर हिवाळी अधिवेशनात कायदा करण्याचे नियोजन झाल्याने या प्रक्रियेला निश्चित दिशा मिळाली आहे.

कोल्हापुरात गूळ उद्योगाची २०० कोटींहून अधिक उलाढाल

‘गुळाची पंढरी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यात गूळ उद्योगाची उलाढाल मोठी आहे. जिल्ह्यात सुमारे २०० पेक्षा जास्त गुऱ्हाळघरे असल्याचे सांगितले जाते. करवीर, कागल आणि शाहूवाडी तालुक्यांत गुऱ्हाळांची संख्या अधिक आहे.जिल्ह्यात दरवर्षी गुळाची सुमारे २०० ते ३०० कोटी रुपयांची उलाढाल होते. तसेच २० ते ३० लाख गूळ रव्यांची आवक होते. एका रव्याचे वजन सुमारे ३० किलो असते. सध्या जिल्ह्यातील २० ते ३० गुऱ्हाळघरे सुरू असून तेथून गुळाची आवक सुरू आहे.

सुधारित अहवालावर काम सुरू

गूळ उद्योगासंदर्भातील मसुदा अहवालाचे काम सध्या सुरू आहे. आणखी एक अहवाल सादर करायचा असून, त्यावर काम सुरू आहे. अहवालाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तो पुढील कार्यवाहीसाठी सादर करण्यात येईल, अशी माहिती साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांनी दैनिक ‘सकाळ’शी बोलताना दिली.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here