सांगली : एकेकाळी हजारो क्विंटल ताज्या गुळाचे उत्पादन घेणाऱ्या वारणाकाठावरील गुऱ्हाळघरांची धुराडी आता कायमची विझण्याच्या मार्गावर आहेत. शिराळा तालुका म्हणजे पूर्वी गुऱ्हाळघरांचे माहेरघर म्हणून ओळखला जात होता. मात्र, वाढता उत्पादन खर्च, आर्थिक अडचणी, बाजारभावातील अनिश्चितता आणि ऊस उपलब्धतेच्या समस्येमुळे हा पारंपरिक गूळनिर्मिती उद्योग जवळपास नामशेष झाला आहे. सध्या शिराळा तालुक्यातील कणदूर येथे एकमेव गुऱ्हाळघर सुरू असून, अन्य गावांतील गुऱ्हाळघरांचे अस्तित्व संपुष्टात आले आहे.
एकेकाळी वारणाकाठावरील मणदूरपासून देववाडीपर्यंतच्या अनेक गावांमध्ये शेकडो गुऱ्हाळघरे सुरू होती. ऑक्टोबर ते मार्च या हंगामात या गुऱ्हाळघरांमधून हजारो क्विंटल ताज्या गुळाची निर्मिती केली जात होती. या व्यवसायामुळे ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांना हंगामी रोजगार मिळत होता. ऊस उत्पादक शेतकरी, गुऱ्हाळमालक, कामगार आणि व्यापारी अशा अनेक घटकांची आर्थिक उलाढाल या उद्योगावर अवलंबून होती. मात्र, कालांतराने उत्पादन खर्चात झालेली वाढ, आर्थिक चणचण आणि गुळाच्या बाजारपेठेतील अनिश्चिततेमुळे गुऱ्हाळ उद्योगाची घडी विस्कटत गेली.
शेतकऱ्यांनी फिरवली गुऱ्हाळघरांकडे पाठ!
पूर्वी शेतकरी स्वतःहून आपला ऊस गाळपासाठी गुऱ्हाळघरांमध्ये घेऊन येत असत. शेतकऱ्यांचा ऊस मिळवण्यासाठी गुऱ्हाळमालकांना विनवणी करावी लागत असे. गुळाची विक्री झाल्यानंतर एकरकमी पैसे मिळत असल्याने या व्यवसायाकडे शेतकऱ्यांचा कल होता. मात्र, पुढील काळात गुळाच्या दरातील चढ-उतार, दर निश्चित करताना होणारी आर्थिक कोंडी आणि अपेक्षित मोबदला मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी गुऱ्हाळघरांकडे पाठ फिरवली. परिणामी, गुऱ्हाळमालकांसमोर ऊस उपलब्धतेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आणि अनेकांनी व्यवसाय बंद करण्याचा निर्णय घेतला.
शिराळा तालुक्यात कणदूरमध्ये एकमेव गुऱ्हाळघर
सध्याच्या परिस्थितीत शिराळा तालुक्यातील कणदूर येथे एकमेव गुऱ्हाळघर कसेबसे सुरू आहे. तालुक्यातील अन्य गावांमधील गुऱ्हाळघरांचे अस्तित्व जवळपास संपले आहे. एवढेच नव्हे, तर गेल्या दोन वर्षांत शाहूवाडी तालुक्यातील अनेक गावांमधील गुऱ्हाळघरेही कायमची बंद झाली आहेत. त्यामुळे या परिसरातील पारंपरिक गूळनिर्मिती व्यवसाय नामशेष होण्याच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे.
गूळ उद्योगाला हमीभाव आणि अनुदानाची गरज
पारंपरिक गुऱ्हाळ उद्योगाला पुन्हा उभारी देण्यासाठी शासनाने ठोस धोरण आखण्याची गरज आहे. गुळाला प्रतिक्विंटल किमान हमीभाव निश्चित केल्यास गुऱ्हाळमालकांना आर्थिक स्थैर्य मिळू शकते. कोल्हापूरसह अन्य बाजारपेठांमध्ये गुळाला प्रतिक्विंटल किमान ४,५०० रुपये दर मिळाल्यास हा व्यवसाय पुन्हा सुरू करण्यासाठी गुऱ्हाळमालकांना प्रोत्साहन मिळू शकते. याशिवाय गुऱ्हाळघरांच्या आधुनिकीकरणासाठी आणि उत्पादन खर्च कमी करण्यासाठी शासनाने विशेष अनुदान योजना राबवावी, अशी मागणी होत आहे. ग्रामीण भागातील रोजगाराचे साधन आणि महाराष्ट्राच्या पारंपरिक गूळनिर्मिती संस्कृतीचा महत्त्वाचा भाग असलेला हा उद्योग टिकवण्यासाठी शासनाने वेळीच लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.

















