सोलापूर : यंदाचा ऊस गाळप हंगाम १५ ऑक्टोबरपासून किंवा त्यापूर्वी सुरू करण्यास शासनाने परवानगी दिली असली, तरी साखर कारखान्यांना गाळप सुरू करण्यापूर्वी अधिकृत गाळप परवाना घेणे बंधनकारक आहे. परवानगीशिवाय गाळप सुरू करणाऱ्या कारखान्यांवर थेट कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा सोलापूरचे साखर सहसंचालक किरण गायकवाड यांनी दिला आहे. यंदा ऊसाची उपलब्धता कमी होण्याची शक्यता व्यक्त होत असल्याने काही कारखाने परवाना न घेता गाळप सुरू करण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सोलापूरचे साखर सहसंचालक कार्यालय कारखान्यांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.
१५ ऑक्टोबरपूर्वी गाळपासाठीही परवाना आवश्यक
गाळप परवाना मिळविण्यासाठी आवश्यक असलेले सर्व कायदेशीर आणि प्रशासकीय निकष पूर्ण करणाऱ्या कारखान्यांना १५ ऑक्टोबरपासून किंवा त्यापूर्वी गाळप हंगाम सुरू करता येणार आहे. मात्र, हंगाम लवकर सुरू करण्याची कोणतीही सक्ती करण्यात आलेली नाही. १५ ऑक्टोबरपूर्वी गाळप सुरू करण्यासाठी अर्ज करणाऱ्या आणि आवश्यक निकष पूर्ण करणाऱ्या कारखान्यांना गाळप परवाना देण्याची शासनाची भूमिका आहे. मात्र, गाळप हंगाम सुरू करण्यापूर्वी साखर आयुक्त कार्यालयाकडून अधिकृत गाळप परवाना प्राप्त करणे कारखान्यांसाठी अनिवार्य आहे.
४९ कारखान्यांचे परवान्यासाठी अर्ज
सोलापूर आणि धाराशिव या दोन जिल्ह्यांतील ४९ साखर कारखान्यांनी गाळप परवान्यासाठी सोलापूरच्या साखर सहसंचालक कार्यालयाकडे अर्ज दाखल केले आहेत. यापैकी तब्बल ४५ कारखान्यांच्या अर्जांमध्ये काही ना काही त्रुटी आढळून आल्या आहेत. संबंधित कारखान्यांना या त्रुटींची पूर्तता करण्याबाबत कळविण्यात आले आहे. दरम्यान, चार साखर कारखान्यांनी परिपूर्ण प्रस्ताव सादर केले असून, त्यांचे प्रस्ताव साखर सहसंचालक कार्यालयाकडून पुढील मंजुरीसाठी वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात आले आहेत.
परवान्याची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे आवाहन
साखर कारखान्यांनी गाळप परवान्याची प्रक्रिया वेळेत आणि तातडीने पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन साखर सहसंचालक कार्यालयाने केले आहे. परवाना नसताना कारखाना सुरू केल्यास संबंधित कारखान्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. परवानगीशिवाय कोणते कारखाने गाळप सुरू करतात, यावर विभागाकडून विशेष लक्ष ठेवण्यात येत असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. साखर कारखान्यांनी वेळेत आणि तत्काळ गाळप परवान्याची प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी. गाळप परवाना नसताना साखर कारखाना सुरू केल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाईल. परवान्याशिवाय कोणते कारखाने सुरू झाले आहेत, याबाबत कार्यालयाकडून बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे, असे साखर सहसंचालक किरण गायकवाड यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.


















