अहिल्यानगर : कमी पाऊस आणि वातावरणातील बदलांमुळे पिकांवरील किडींचा प्रादुर्भाव वाढत असून, त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी तसेच शेतीची उत्पादकता वाढवण्यासाठी शेतकऱ्यांनी जैविक खतांचा अधिकाधिक वापर करावा, असे आवाहन माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर आयसीएआर, भारतीय ऊस संशोधन संस्था आणि जैविक नियंत्रण केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात २५ शेतकऱ्यांना जैविक किटचे वितरण करण्यात आले. यावेळी थोरात बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कारखान्याचे उपाध्यक्ष पांडुरंग घुले होते. व्यासपीठावर शास्त्रज्ञ डॉ. ज्ञानेश्वर बोरसे, डॉ. योगेश थोरात, संचालक संपतराव गोडगे, रामनाथ कुटे, सतीश वर्षे, योगेश भालेराव, दिलीप नागरे, रावसाहेब दुबे, सुंदराबाई दुबे, माणिकराव यादव, कदम, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, किरण कानवडे, कृष्णा दिघे, कृषी अधिकारी भाऊसाहेब खर्डे आणि ऊस विकास अधिकारी बाळासाहेब सोनवणे यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.
जैविक खतांमुळे जमिनीचा पोत सुधारण्यास मदत
बाळासाहेब थोरात म्हणाले, यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्याने राज्यात अनेक ठिकाणी दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. वातावरणातील बदलांमुळे हुमणी अळी, पायरीला, खोडकिड आणि पांढऱ्या माशीसारख्या किडींचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशा परिस्थितीत जैविक खतांचा वापर फायदेशीर ठरू शकतो. रासायनिक खतांच्या तुलनेत जैविक खतांचा वापर केल्यास जमिनीत हवा खेळती राहण्यास मदत होते. तसेच शेतीचा उत्पादन खर्च कमी होण्यास, किडींचे नियंत्रण करण्यास आणि जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढवण्यास मदत होते. त्यामुळे पिकांची उत्पादकता वाढवण्यासाठी शेतकऱ्यांनी जैविक खतांच्या वापराला प्राधान्य द्यावे, असे त्यांनी सांगितले.
कमी पावसामुळे किडींचा प्रादुर्भाव वाढला
डॉ. योगेश थोरात यांनी कमी पावसामुळे हुमणी अळीचा उपद्रव वाढत असल्याचे सांगितले. पायरीला किडीचाही प्रादुर्भाव वाढत असल्याने शेतकऱ्यांनी वेळीच उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. डॉ. ज्ञानेश्वर बोरसे म्हणाले, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली थोरात कारखान्याने शेतकरी आणि ऊस उत्पादकांना नेहमीच चांगल्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. शेतकऱ्यांच्या हितासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व मोठे आहे. प्रास्ताविक ऊस विकास अधिकारी बाळासाहेब सोनवणे यांनी केले, तर उपाध्यक्ष पांडुरंग घुले यांनी उपस्थितांचे आभार मानले.


















