मराठवाडा : उसाच्या पाचटापासून सीएनजी उत्पादन, कायगाव परिसरात सेंद्रिय शेतीला चालना

छत्रपती संभाजीनगर : गंगापूर तालुक्यातील गोदावरी नदीकाठ परिसरात उसाचे मोठे क्षेत्र आहे. तालुक्यातील गणेशवाडी (ता. गंगापूर) येथील शेतकरी अनिल कळसकर यांनी अमळनेर शिवारातील पाचट गट्टू करण्यासाठी दिले आहे. आता त्यांच्या शेतात गट्टू तयार झाले आहेत. टाकाऊ पाचटातून टिकाऊ संपत्ती तयार होत असून त्यापासून सीएनजी तयार केले जाते. अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा फाटा येथील कृषी रत्न ऍग्रोटेकने हा प्रयोग यशस्वी केला आहे. पाचट ट्रॅक्टरला जोडलेल्या रेकरने गोळा करण्यात येते. त्यानंतर बेलर मशीनने त्याचा ३०० किलोचा गोल राऊंड बेल म्हणजेच गट्टू तयार केला जातो. हे बेल ट्रेलरने उचलून देवगड फाटा (ता. नेवासा) येथे स्टॉक करण्यात येतात. त्यानंतर नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथून रिलायन्स कंपनीला ते पाठवले जातात. या पाचटापासून सीएनजी निर्मिती सुरू केली जाते. पाचटापासून सीएनजी निर्मिती सुरू झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान आहे. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

कंपनीच्यावतीने सांगण्यात आले की, एक बेल ३०० किलोचा असतो. एकरी ३० ते ३२ बेल गट्टू निघतात. दिवसाला ९ ते १० एकरमधून १५० च्या वर गट्टू तयार केले जातात. या कामासाठी १० मजूर काम करतात, तर ६ ट्रॅक्टर कार्यरत आहेत. ऊस तुटल्यानंतर शेतात पडलेलं पाचट जाळलं तर कोंब जळतात, प्रदूषण होतं. पण तेच पाचट गोळा केलं तर त्यापासून सीएनजी तयार होतो, दुष्काळात जनावरांना सुका चारा मिळतो आणि शेतकऱ्याला अतिरिक्त उत्पन्न मिळते. शिवाय उसाचा फुटवादेखील चांगला होतो. ऊस पेटवून दिल्यानंतर त्याचे कोंब जळतात. मात्र, पाचट गोळा केले तर ऊसाचे कोंब जळत नाहीत. त्यामुळे पुढच्या खोडव्याला ऊस जोमदार फुटवा करतो. ऊसाचे पाचट हे टाकाऊ नाही, तर टिकाऊ आहे. शेतकऱ्यांनी पाचट जाळण्यापेक्षा गोळा करून द्यावे, असे आवाहन कृषी रत्न ऍग्रोटेकचे मालक सुशांत लवांडे यांनी केले. शेतकरी आता सेंद्रिय शेतीला प्राधान्य देत आहेत असे ते म्हणाले.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here