कोल्हापूर : साखरेचा किमान विक्रीभाव वाढवणे, इथेनॉलच्या दरात सुधारणा करणे आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान देणे, या तीन प्रमुख मागण्यांवर केंद्र सरकारसोबत नवी दिल्ली येथे सोमवारी (ता. १२) झालेली बैठक निष्फळ ठरली. त्यामुळे महाराष्ट्र आणि कर्नाटकातील हजारो ऊस उत्पादक शेतकरी आक्रमक झाले असून, मंगळवारी (ता. १३) सकाळी ११ वाजल्यापासून कोगनोळी टोलनाक्यावर पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्ग बेमुदत रोखून धरण्यात आला. यामुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प झाली.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील कोगनोळी आणि कर्नाटकातील हत्तरकी टोलनाक्यावर शेतकऱ्यांनी बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले. हजारो शेतकरी रस्त्यावर उतरल्याने महामार्गावरील वाहतुकीचा खोळंबा झाला असून, प्रशासनाला वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्यांवर ठोस आणि लेखी निर्णय जाहीर केल्याशिवाय महामार्गावरून हटणार नाही, असा निर्धार राजू शेट्टी यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमेवरील शेतकरी आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
तीन प्रमुख मागण्यांवर तोडगा नाही; शेतकऱ्यांमध्ये नाराजी
साखर उद्योगातील आर्थिक प्रश्न आणि ऊस उत्पादकांच्या अडचणी सोडवण्यासाठी नवी दिल्ली येथे केंद्र सरकारचे प्रतिनिधी आणि शेतकरी संघटनेच्या नेत्यांमध्ये महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने तीन प्रमुख मागण्या मांडल्या होत्या.
साखरेचा किमान विक्रीभाव: साखरेचा किमान विक्रीभाव (एमएसपी) प्रतिकिलो ५० रुपये करण्यात यावा.
इथेनॉलचा दर: सी-हेव्ही मळीपासून तयार होणाऱ्या इथेनॉलचा दर प्रतिलिटर ७० रुपये निश्चित करण्यात यावा.
ऊस उत्पादकांना अनुदान: केंद्र सरकारच्या निर्देशानुसार साखर हंगाम लवकर सुरू केल्यामुळे ऊस उत्पादकांना प्रतिटन ५०० रुपये अनुदान देण्यात यावे.
मात्र, या मागण्यांवर बैठकीत कोणताही ठोस निर्णय झाला नाही. त्यामुळे शेतकरी संघटनेने आंदोलनाचा मार्ग स्वीकारला. साखरेचा विक्रीभाव, इथेनॉलचे दर आणि ऊस उत्पादकांना मिळणारा परतावा या बाबींचा थेट परिणाम शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर होत असल्याने सरकारने केवळ चर्चेपुरते मर्यादित न राहता ठोस निर्णय घ्यावा, अशी संघटनेची भूमिका आहे.
कोगनोळी आणि हत्तरकी टोलनाक्यावर ठिय्या; वाहनांच्या लांबच लांब रांगा
नवी दिल्लीतील बैठक निष्फळ ठरल्यानंतर आंदोलनाची घोषणा होताच महाराष्ट्र आणि कर्नाटकातील शेतकरी मोठ्या संख्येने कोगनोळी आणि हत्तरकी टोलनाक्यांवर दाखल झाले. दोन्ही ठिकाणी आंदोलकांनी ठिय्या दिल्याने पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली.वाहनांच्या लांबच लांब रांगा लागण्याची परिस्थिती निर्माण झाल्याने पोलिसांनी वाहतूक नियंत्रणासाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत. प्रशासनाकडून वाहनांना पर्यायी तसेच अंतर्गत मार्गांनी वळविण्यात येत आहे. महामार्गावरील कोंडी नियंत्रणात आणण्यासाठी पोलिस यंत्रणा सतर्क झाली आहे.दरम्यान, या आंदोलनामुळे प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे प्रवाशांनी प्रवासाला निघण्यापूर्वी महामार्गावरील वाहतुकीची सद्यःस्थिती तपासूनच प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


















