कोल्हापूर : अथणी शुगर्सकडून यंदाच्या हंगामासाठी ४२०० रुपये प्रतिटन ऊसदर जाहीर

कोल्हापूर : बांबवडे (ता. शाहूवाडी) येथील अथणी शुगर्सच्या युनिट क्रमांक दोन अर्थात उदयसिंगराव गायकवाड साखर कारखान्याने चालू गळीत हंगामासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन ४२०० रुपये दर देण्याची घोषणा केली आहे. कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक श्रीनिवास पाटील यांनी ही माहिती दिली.

जाहीर केलेल्या दरानुसार, ऊस गाळप झाल्यानंतर शेतकऱ्यांना पहिला हप्ता म्हणून प्रतिटन ३९०० रुपये देण्यात येणार आहेत. कारखान्याचा गळीत हंगाम संपल्यानंतर दुसरा हप्ता म्हणून १०० रुपये दिले जातील. तसेच वर्षअखेरीस साखरेचा सरासरी दर प्रतिकिलो ४५०० रुपयांपेक्षा अधिक राहिल्यास तिसरा अंतिम हप्ता म्हणून २०० रुपये पुढील दिवाळीपर्यंत देण्यात येणार आहेत.याशिवाय कारखान्याला ऊस पुरवठा करणाऱ्या सभासद आणि बिगरसभासद शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात प्रतिटन एक किलो साखर देण्यात येणार असल्याचेही श्रीनिवास पाटील यांनी स्पष्ट केले.

ChiniMandi WhatsApp Channel

५.५० लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट

कारखान्याचे संस्थापक संचालक योगेश पाटील यांनी यंदाच्या हंगामात ५ लाख ५० हजार मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट निश्चित केल्याचे सांगितले. एफआरपीपेक्षा अधिक ऊसदर देण्याबरोबरच ऊस बिले आणि तोडणी-वाहतूक बिले वेळेत अदा करण्याची परंपरा यंदाही कायम ठेवण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले.यावेळी कारखान्याचे अध्यक्ष मानसिंगराव गायकवाड, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक रणवीरसिंग गायकवाड, अन्य संचालक, युनिट हेड रवींद्र देशमुख, कार्यकारी संचालक भगवान पाटील, सर्व विभागप्रमुख आणि कर्मचारी उपस्थित होते.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here