नवी दिल्ली: भारतात चालू इथेनॉल पुरवठा वर्षाच्या सप्टेंबरअखेरपर्यंत तेल विपणन कंपन्यांना (OMCs) झालेला इथेनॉलचा एकूण पुरवठा 987 कोटी लिटरवर पोहोचला आहे. यामध्ये धान्याधारित कच्च्या मालापासून तयार होणाऱ्या इथेनॉलचा वाटा 71 टक्क्यांहून अधिक आहे. ऑल इंडिया डिस्टिलर्स असोसिएशनने (AIDA) गुरुवारी ही माहिती दिली. AIDA ने दिलेल्या निवेदनानुसार, इथेनॉल पुरवठा वर्ष 2025-26 (नोव्हेंबर ते ऑक्टोबर) मध्ये तेल विपणन कंपन्यांसाठी एकूण 1,197 कोटी लिटर इथेनॉलचे करारानुसार वाटप करण्यात आले होते. त्यापैकी सप्टेंबरअखेरपर्यंत 987 कोटी लिटर इथेनॉलचा पुरवठा झाला. ही एकूण वाटपाच्या तुलनेत 82.5 टक्के पूर्तता आहे.
धान्याधारित इथेनॉलचा पुरवठा 705 कोटी लिटर
धान्याधारित कच्च्या मालापासून 705 कोटी लिटर इथेनॉलचा पुरवठा झाला. एकूण पुरवठ्यात या इथेनॉलचा वाटा 71.4 टक्के आहे. या श्रेणीसाठी 908 कोटी लिटरचे वाटप करण्यात आले होते. त्या तुलनेत पुरवठ्याची पूर्तता 77.6 टक्के झाली. धान्याधारित इथेनॉलच्या उत्पादनात मक्याचा सर्वाधिक वाटा आहे. मक्यापासून 413 कोटी लिटर इथेनॉलचा पुरवठा झाला. हा एकूण इथेनॉल पुरवठ्याच्या 41 टक्क्यांहून अधिक आहे. मक्यापासून इथेनॉल निर्मितीसाठी 614 कोटी लिटरचे वाटप करण्यात आले होते. भारतीय अन्न महामंडळाच्या (FCI) अतिरिक्त तांदळापासून 233 कोटी लिटरच्या वाटपापैकी 222 कोटी लिटर इथेनॉलचा पुरवठा झाला. तर खराब झालेल्या अन्नधान्यापासून 60 कोटी लिटरचे वाटप असताना 70 कोटी लिटर इथेनॉलचा पुरवठा करण्यात आला.
साखराधारित कच्च्या मालापासून 282 कोटी लिटर इथेनॉल
साखराधारित कच्च्या मालापासून एकूण 282 कोटी लिटर इथेनॉलचा पुरवठा झाला. या श्रेणीसाठी 289 कोटी लिटरचे वाटप करण्यात आले होते. त्यामुळे पुरवठ्याची पूर्तता 97.6 टक्के झाली.
साखराधारित कच्च्या मालापासून झालेल्या इथेनॉल पुरवठ्याचा तपशील पुढीलप्रमाणे:
उसाचा रस: 166 कोटी लिटरच्या वाटपापैकी 151 कोटी लिटरचा पुरवठा.
बी-हेवी मोलासेस: 111 कोटी लिटरच्या वाटपाच्या तुलनेत 115 कोटी लिटरचा पुरवठा.
सी-हेवी मोलासेस : 12 कोटी लिटरच्या वाटपाच्या तुलनेत 16 कोटी लिटरचा पुरवठा.
या आकडेवारीनुसार, साखराधारित कच्च्या मालापासून झालेला एकूण इथेनॉल पुरवठा निर्धारित उद्दिष्टाच्या जवळ पोहोचला आहे. बी-हेवी आणि सी-हेवी मळीपासून झालेला पुरवठा त्यांच्या निर्धारित वाटपापेक्षा अधिक आहे.
ऊर्जा सुरक्षेसाठी विविध कच्च्या मालावर आधारित पुरवठा आवश्यक: AIDA
AIDA च्या उपमहासंचालिका भारती बालाजी यांनी सांगितले की, दीर्घकालीन ऊर्जा सुरक्षेसाठी विविध प्रकारच्या कच्च्या मालावर आधारित मजबूत पुरवठा व्यवस्था उभारणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्या म्हणाल्या की, इथेनॉल क्षेत्रातील गुंतवणूक कायम ठेवण्यासाठी धोरणांमध्ये सातत्य आणि इथेनॉलच्या वापरासाठी अधिक संधी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. यामध्ये फ्लेक्स-फ्युएल वाहने, शाश्वत विमान इंधन (SAF) आणि कॉम्प्रेस्ड बायोगॅस (CBG) यांसारख्या पर्यायांचा समावेश आहे.या उपाययोजनांमुळे गुंतवणुकीला चालना मिळेल आणि कृषी मूल्यसाखळी अधिक मजबूत होण्यास मदत होईल, असेही त्यांनी नमूद केले.


















