पुणे : केंद्र सरकारने पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रण (ईपीबी) बाबत लागू केलेल्या धोरणात साखर कारखाने आणि डिस्टिलरीजची भूमिका महत्त्वाची आहे. इथेनॉल उत्पादनामुळे साखर उद्योगालाही अतिरिक्त उत्पन्नाचा स्रोत उपलब्ध होतो. विशेषतः साखरेचे अतिरिक्त उत्पादन झालेल्या काळात त्याचा काही भाग इथेनॉलकडे वळविल्याने साखर कारखान्यांची आर्थिक स्थिती आणि ऊस उत्पादकांना देयके यावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो, असे केंद्र सरकारचे म्हणणे आहे. मात्र, जिल्ह्यातील नऊ युनिट्सपैकी चार साखर कारखान्यांनी इथेनॉल उत्पादनाचा कोटा जवळपास १०० टक्के वापरला आहे. या तुलनेत काही कारखान्यांनी अतिशय अत्यल्प पुरवठा केला आहे. त्यामुळे जिल्ह्यात कारखान्यांना मंजूर झालेला कोटा आणि प्रत्यक्ष पुरवठ्यातील तफावत कशामुळे आहे, हे तपासण्याची गरज आहे.
इथेनॉल उत्पादनासाठी मका, ‘एफसीआय’चा अतिरिक्त तांदूळ आणि खराब झालेले अन्नधान्य यांसारख्या कच्च्या मालाचाही वापर केला जातो. जिल्ह्यात नीरा भीमा सहकारी साखर कारखाना, सोमेश्वर सहकारी साखर कारखाना, विघ्नहर सहकारी साखर कारखाना, संत तुकाराम सहकारी साखर कारखाना, माळेगाव सहकारी साखर कारखाना, भीमाशंकर सहकारी साखर कारखाना, पराग ग्रो फूड्स, रेगोला बायो-केमिकल, वेंकटेशकृपा शुगर मिल्स याांच्याकडून इथेनॉल उत्पादन केले जाते. इथेनॉल पुरवठा वर्ष २०२५-२६ मध्ये चालू वर्षीच्या ऑगस्टअखेरच्या आकडेवारीनुसार, नीरा-भीमा सहकारी साखर कारखान्याने ८,१४५ किलोलीटरच्या कोट्यापैकी ८,०६३ किलोलीटर, म्हणजेच ९९ टक्के इथेनॉल पुरवठा केला आहे. सोमेश्वर, विघ्नहर आणि संत तुकाराम या कारखान्यांचाही पुरवठा ९७ टक्क्यांहून अधिक आहे. याउलट भीमाशंकर कारखान्याने पुरवठा केवळ १२. ९ टक्के इथेनॉल पुरवठा केला आहे. तर पराग ग्रो फूड्सचा ९.२ टक्के एवढाच आहे. ही उत्पादन क्षमता का घटली, त्यामागे कच्च्या मालाची उपलब्धता नसणे अथवा आर्थिक व्यवहार्यता अशी कारणे होती का? याचा तपास होण्याची गरज असल्याचे मत साखर उद्योगातील तज्ज्ञांचे आहे.

















