बेळगाव : गेल्या तीन वर्षांपासून बंद असलेला मार्कंडेय साखर कारखाना यंदाच्या गळीत हंगामात सुरू करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. कारखाना सुरू करण्याच्या दृष्टीने यंत्रसामग्रीच्या दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली असून, दोन दिवसांपूर्वी मील रोलरचे पूजन करण्यात आले. निवडणुकीनंतर नवीन संचालक मंडळ सत्तेवर आल्याने कारखाना पुन्हा सुरू होईल, अशी अपेक्षा सभासदांनी व्यक्त केली होती. मात्र, कारखाना सुरू होण्यास विलंब झाल्याने त्यांच्या अपेक्षांवर पाणी फिरले आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामात तरी ऊस गाळप सुरू होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सद्यस्थितीत कारखाना भाडेतत्त्वावर देण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून, आगामी काही दिवसांत कारखाना चालविण्याची जबाबदारी कोणाकडे सोपविण्यात येणार, हे स्पष्ट होण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या सर्वसाधारण सभेत कारखाना भाडेतत्त्वावर देण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर ही प्रक्रिया पुढे सरकली असून, ती अंतिम टप्प्यात असल्याचे सांगण्यात येत आहे. यासंदर्भात कारखान्याचे माजी अध्यक्ष आर. आय. पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र संपर्क होऊ शकला नाही. कारखाना अनेक वर्षांपासून बंद असल्याने सभासद आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. सध्या गाळपासाठी पर्यायी साखर कारखान्यांवर अवलंबून राहावे लागत असल्याने शेतकऱ्यांना वाहतूक आणि अन्य अडचणींचा सामना करावा लागत आहे. कारखाना सुरू करून ऊस गाळप घेण्याच्या दृष्टीने आवश्यक कामांना सुरुवात करण्यात आली आहे. ऑक्टोबर महिना सुरू झाल्याने यंत्रसामग्रीची दुरुस्ती आणि अन्य तयारी केली जात आहे. पुढील महिन्याच्या अखेरीस कारखाना सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात असली, तरी प्रत्यक्ष गाळपाची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही.


















