कर्नाटक : साखरेचा एमएसपी वाढीचा शेतकऱ्यांनाही फायदा – मंत्री सतीश जारकीहोळी यांचे मत

बेळगाव : ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा दराचा प्रश्न गंभीर असून, त्यावर तोडगा काढण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. साखरेच्या किमान विक्री दरात (एमएसपी) वाढ केल्यास साखर कारखान्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासोबतच ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाही त्याचा लाभ होऊ शकतो, असे मत जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी व्यक्त केले. सुवर्णसौध येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना जारकीहोळी यांनी साखरेच्या एमएसपी वाढीच्या मागणीचे महत्त्व अधोरेखित केले. साखर कारखानदारांनी यापूर्वी विविध मागण्या मांडल्या होत्या. मात्र, अद्याप त्यांची पूर्तता झालेली नसल्याचे जारकीहोळी यांनी सांगितले. मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार ऊस उत्पादकांच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी कारखानदारांसोबत बैठक समस्या जाणून घेऊन योग्य तो निर्णय घेतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पालकमंत्री जारकीहोळी म्हणाले की, साखरेचा किमान विक्री दर वाढविल्यास कारखान्यांना आर्थिक मदत होईल. त्यातून ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या दराच्या प्रश्नावरही सकारात्मक मार्ग निघू शकतो. कित्तूर दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री शिवकुमार यांनी शेतकऱ्यांची बैठक घेण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार प्रथम कारखानदारांशी चर्चा होईल आणि त्यानंतर शेतकरी नेत्यांशी संवाद साधला जाईल, असे त्यांनी सांगितले. सध्या कारखानदारांचेही काही प्रश्न प्रलंबित असल्याचे ते म्हणाले. कारखान्यांकडून खरेदी करण्यात आलेल्या विजेची बिले प्रलंबित आहेत. वीज खरेदी कराराचा कालावधी २० वर्षांपर्यंत वाढविण्याची मागणी करण्यात आली आहे. शिवाय, कारखान्यांकडून वापरण्यात येणाऱ्या पाण्यावरील कर कमी करावा आणि साखरेचा किमान विक्री दर वाढवावा, अशा मागण्याही कारखानदारांनी केल्या आहेत.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here