धाराशिव : नॅचरल शुगर अॅण्ड अलाईड इंडस्ट्रीज लि., साईनगर (रांजणी) कारखान्याच्या सभासदांची दिवाळी गोड व्हावी, यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही सवलतीच्या दरात साखर आणि शुद्ध तुपाचे वाटप सुरू करण्यात आले आहे. कारखान्याच्या वतीने सभासदांना त्यांच्या भागभांडवलाच्या प्रमाणात साखर उपलब्ध करून दिली जात आहे. कारखान्याकडून साखरेचे वाटप प्रतिकिलो ३५ रुपये या सवलतीच्या दराने करण्यात येत आहे. प्रत्येक १०० शेअर्समागे १० किलो साखर दिली जाणार असून, सभासदांकडे असलेल्या एकूण शेअर्सच्या प्रमाणात साखरेचे वाटप केले जाईल.
बुधवारपासून (ता. २८) सुरू झालेले हे वाटप ६ नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. कारखान्याच्या शेती विभागांतर्गत संबंधित गट कार्यालयांमध्ये सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळेत सभासदांना साखर घेता येणार आहे.यासोबतच नॅचरल डेअरीच्या माध्यमातून गाईचे शुद्ध तूपही सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यात आले आहे. प्रतिलिटर ६०० रुपये दराने प्रत्येक सभासदाला अर्धा ते एक लिटर तूप दिले जात आहे.नॅचरल शुगरच्या सर्व सभासदांनी संबंधित गट कार्यालयाशी संपर्क साधून निर्धारित मुदतीत साखर व तूप घेऊन या उपक्रमाला सहकार्य करावे, असे आवाहन समूहाचे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे यांनी केले आहे.दरम्यान, साखर व तूप घेण्यासाठी येताना सभासदांनी ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड किंवा भाग प्रमाणपत्र सोबत आणणे आवश्यक असल्याचे कारखाना प्रशासनाने स्पष्ट केले आहे.


















