धाराशिव : ओंकार शुगरच्या युनिट क्रमांक १८ कडून ३३०५ रुपयांचा पहिला हप्ता जाहीर

धाराशिव : दुष्काळ, पाणीटंचाई आणि वाढत्या उत्पादन खर्चामुळे अडचणीत सापडलेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना हावरगाव येथील ओंकार शुगरच्या तुळजाई शुगर इंडस्ट्रीज लि. (युनिट क्रमांक १८) च्या नव्या व्यवस्थापनाने दिलासा दिला आहे. कारखान्याची मालकी बाबूराव बोत्रे-पाटील यांच्याकडे आल्यानंतर पहिल्याच गळीत हंगामासाठी प्रतिटन ३३०५ रुपये पहिला हप्ता जाहीर करण्यात आला आहे. तसेच अंतिम ऊस दर इतर कारखान्यांच्या तुलनेत अधिक देण्याचा मानस व्यवस्थापनाने व्यक्त केला आहे.

हावरगाव येथील तुळजाई शुगर इंडस्ट्रीजच्या पहिल्या गळीत हंगामाला नुकतीच सुरुवात झाली. मागील हंगामात हा कारखाना डीडीएन शुगर, मुरूड यांच्याकडून चालविण्यात येत होता. त्यावेळी ऊस उत्पादकांना प्रतिटन २७०० रुपये दर देण्यात आला होता. मात्र, ओंकार शुगरने पहिल्याच हंगामात ३३०५ रुपयांचा पहिला हप्ता जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे.

ChiniMandi WhatsApp Channel

दरम्यान, तालुक्यातील गूळ पावडरसह साखर कारखान्याने प्रतिटन ३१५० रुपये दर जाहीर केला आहे. मात्र, दुष्काळी परिस्थितीत पाणी विकत घेऊन ऊस पीक जगविणाऱ्या शेतकऱ्यांच्या वाढत्या उत्पादन खर्चाच्या तुलनेत जाहीर झालेले दर पुरेसे आहेत का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे लक्ष आता अंतिम ऊस दराकडे लागले आहे.

दुसरीकडे, मागील गळीत हंगामातील डीडीएन शुगरकडून मिळणाऱ्या दुसऱ्या हप्त्याचा प्रश्न अद्याप प्रलंबित आहे. पहिल्या हप्त्यापोटी प्रतिटन २७०० रुपये मिळाले असले, तरी उर्वरित रक्कम अद्याप मिळाली नसल्याची तक्रार ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून केली जात आहे.नव्या व्यवस्थापनाने जाहीर केलेल्या दरामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला असला, तरी मागील हंगामातील थकीत रक्कम मिळणेही तितकेच महत्त्वाचे आहे. डीडीएन शुगरकडील प्रलंबित देयकांचा प्रश्न तातडीने सोडविण्यासाठी भाजपच्या जिल्ह्यातील नेत्यांनी लक्ष घालावे आणि शेतकऱ्यांना त्यांची हक्काची रक्कम मिळवून देण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी ऊस उत्पादक शेतकऱ्यांतून होत आहे.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here