महाराष्ट्र : मजुरी बुडू नये म्हणून १०७ ऊसतोड महिला मजुरांनी काढून टाकले गर्भाशय; जालन्यातील धक्कादायक घटना

जालना : एकीकडे महाराष्ट्रातील अनेक भागांत दुष्काळाचे चटके जाणवत असून शेतातील उभी पिके वाळत आहेत. शेतीची कामेही कमी झाली आहेत. अशातच जालना जिल्ह्यातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ‘न्यूज १८ मराठी’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, ऊसतोडणी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या १०७ महिलांनी गर्भाशय काढून टाकल्याचा दावा करण्यात आला आहे. मासिक पाळीमुळे मजुरी बुडू नये, या भीतीपोटी महिलांनी हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे, एका खासगी संस्थेने हे सर्वेक्षण केले असून, शासकीय आरोग्य विभागाकडे मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नसल्याचे बातमीत म्हटले आहे.

वृत्तानुसार, मासिक पाळीच्या काळात काम करता न येणे आणि त्यामुळे रोजंदारी बुडण्याची भीती यामुळे जालना जिल्ह्यातील १०७ महिलांनी गर्भाशय काढून घेतल्याची माहिती समोर आली आहे. ऊसतोड कामगारांच्या प्रश्नांवर काम करणाऱ्या एका संस्थेने हा प्रकार उजेडात आणला आहे. ऊसतोडणीचे काम करणाऱ्या महिलांना मासिक पाळीच्या काळात काम करताना अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे त्यांच्या मजुरीचे नुकसान होते. आर्थिक नुकसान टाळण्यासाठी काही महिलांना गर्भाशय काढून घेण्यासारखा गंभीर निर्णय घ्यावा लागत असल्याचे या वृत्तातून समोर आले आहे.

ChiniMandi WhatsApp Channel

घनसावंगीत ६३, तर परतूरमध्ये ४४ महिलांची माहिती

उपलब्ध माहितीनुसार, जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील ६३, तर परतूर तालुक्यातील ४४ महिलांनी गर्भाशय काढून घेतल्याची माहिती समोर आली आहे. ऑगस्ट २०२५ ते ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ही प्रकरणे घडल्याचे सांगितले जात आहे. गर्भाशय काढून टाकल्यानंतर महिलांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असते. असे असतानाही आर्थिक विवंचना आणि मजुरी बुडण्याच्या भीतीमुळे महिलांना हा टोकाचा निर्णय घ्यावा लागत असल्याचे चित्र आहे.या पार्श्वभूमीवर ऊसतोड महिला कामगारांचे आरोग्य, त्यांच्या कामाच्या परिस्थिती आणि आर्थिक सुरक्षिततेकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

‘आमच्याकडे अशी कोणतीही अधिकृत माहिती नाही’ : आरोग्य विभाग

या प्रकरणाबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी जयश्री भुसारे यांनी ‘न्यूज १८ मराठी’शी बोलताना सांगितले की, संबंधित सर्वेक्षण एका खासगी संस्थेने केले आहे. मासिक पाळीच्या काळात काम करता न आल्याने मजुरी बुडते आणि त्यामुळे महिलांनी गर्भाशय काढून घेतल्याच्या वृत्ताबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, आरोग्य विभागाच्या सर्वेक्षणात अशा प्रकरणांची कोणतीही आकडेवारी उपलब्ध नाही.

भुसारे यांच्या म्हणण्यानुसार, गर्भाशय काढून घेण्यासारखा निर्णय योग्य वैद्यकीय तपासणी आणि स्त्रीरोगतज्ज्ञांच्या सल्ल्यानंतरच घेतला पाहिजे. आरोग्य विभागाकडून नियमित सर्वेक्षण केले जाते. प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून आवश्यक आरोग्य सुविधा आणि उपचार उपलब्ध करून दिले जातात. मात्र, या प्रकरणासंदर्भात विभागाकडे कोणतीही अधिकृत आकडेवारी नाही.बदनापूर तालुक्यात एका महिलेचे गर्भाशय काढून टाकल्याची नोंद विभागाकडे असल्याचेही त्यांनी सांगितले. योग्य वैद्यकीय कारण नसताना किंवा आवश्यक तक्रार अथवा निदानाशिवाय एखाद्या महिलेचे गर्भाशय काढले गेले असेल, तर ती गंभीर बाब असल्याचे त्यांनी नमूद केले.

प्रकरणाची माहिती घेऊन पुढील कारवाई करणार

जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणाल्या की, १०७ महिलांशी संबंधित प्रकरण समोर आले असताना याची माहिती आरोग्य विभागापर्यंत का पोहोचली नाही, याची तपासणी होणे आवश्यक आहे. समोर आलेल्या वृत्तासंदर्भात अधिकृत पत्र जारी करण्यात आले असून, या प्रकरणाची माहिती गोळा करून पुढील कारवाई केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.या घटनेमुळे ऊसतोड महिला कामगारांची आर्थिक परिस्थिती, आरोग्य सुविधांची उपलब्धता आणि कामाच्या कठीण परिस्थितीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. मासिक पाळीमुळे महिलांचे आर्थिक नुकसान होऊ नये, यासाठी सुरक्षित आणि आरोग्यदायी कामाचे वातावरण, आवश्यक वैद्यकीय सुविधा तसेच आर्थिक संरक्षण उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here