सातारा : पाच हजार रुपये ऊस दरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक, ‘सह्याद्री’ची ऊस वाहतूक रोखली

सातारा : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शहापूर फाटा येथे सह्याद्री सहकारी साखर कारखान्याकडे जाणारी ऊस वाहतूक रोखली. उसाला प्रतिटन पाच हजार रुपये दर मिळावा, या मागणीसाठी आंदोलन तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. शेतकऱ्यांच्या या आंदोलनामुळे ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. आंदोलन मागे घेण्यासाठी कारखाना प्रशासनानेही चर्चा केली. मात्र, चर्चेतून तोडगा न निघाल्याने आंदोलन सुरूच ठेवण्यात आले. आंदोलनावेळी संघटनेचे ‘कराड उत्तर’चे तालुकाध्यक्ष प्रमोदसिंह जगदाळे यांनी सह्याद्री कारखाना प्रशासनाच्या भूमिकेबाबत प्रश्न उपस्थित केला. कारखाने सुरु ठेवायचे असतील तर शेतकऱ्यांना प्रतिटन पाच हजार रुपये दर जाहीर करावा आणि त्यानंतर कारखाना सुरू ठेवावा, अशी मागणी त्यांनी केली.

वाढता उत्पादन खर्च, शेतीसाठी लागणारे भांडवल आणि शेतकऱ्यांचे आर्थिक गणित लक्षात घेता अपेक्षित ऊसदर मिळणे आवश्यक असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. आंदोलनाची तीव्रता लक्षात घेऊन कारखान्यातर्फे कार्यकारी संचालक विश्वजित शिंदे आणि संचालक सुनील जगदाळे यांनी आंदोलनकर्त्या शेतकरी प्रतिनिधींशी चर्चा केली. वाहतूक रोखल्याने कारखान्याच्या ऊस वाहतुकीवर परिणाम होत असताना आंदोलन मागे घेण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात आले. मात्र, ऊसदराच्या मागणीवर एकमत न झाल्याने चर्चेतून मार्ग निघू शकला नाही. आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब यादव, कराड उत्तरचे तालुकाध्यक्ष प्रमोदसिंह जगदाळे, दिनेश घाडगे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी व सभासद उपस्थित होते.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here