नवी दिल्ली : राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या ताज्या अहवालानुसार, देशात 31 ऑक्टोबरअखेर 152 साखर कारखाने सुरु झाले असून त्यांनी 105.43 लाख मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे. तसेच 8.45 लाख मेट्रिक टन साखर उत्पादन झाले आहे. त्यामध्ये आतापर्यंत 7.20 लाख मेट्रिक टन साखर उत्पादनासह महाराष्ट्राने अव्वल स्थान पटकावले आहे. महाराष्ट्रात सध्या 123 साखर कारखान्यांनी आपला गाळप हंगाम सुरु केला असून 91.14 लाख मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे. राज्याचा सरासरी साखर उतारा 7.90 टक्के इतका आहे. मागील वर्षी राज्यात आतापर्यंत केवळ 2 कारखाने सुरु झाले होते.
राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने दिलेल्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रापाठोपाठ गुजरातमध्ये 10 साखर कारखाने सुरु झाले असून त्यांनी 1.25 लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करून 0.05 लाख मेट्रिक टन साखर उत्पादन घेतले आहे. राज्याचा सरासरी साखर उतारा 4.00 इतका कमी आहे. कर्नाटकमध्ये 7 कारखाने सुरु झाले असून आतापर्यंत 8.33 लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करून 0.80 लाख मेट्रिक टन साखरेचे उत्पादन करण्यात आले आहे. कर्नाटकमध्ये सरासरी उतारा 9.60 टक्के आहे.
उत्तर प्रदेशात आतापर्यंत केवळ 3 साखर कारखाने सुरु झाले असून ऊस गाळप आणि साखर उत्पादनाचे आकडे अद्याप उपलब्ध झालेले नाहीत. मागील वर्षी उत्तर प्रदेशमध्ये याच कालावधीत 10 साखर कारखाने सुरु झाले होते. त्यांनी 2.50 लाख मेट्रिक टन ऊस गाळप करून 0.10 लाख मेट्रिक टन साखरेचे उत्पादन केले होते. यंदा अद्याप गाळप हंगामाला गती आलेली नाही. तामिळनाडू आणि तेलंगानामध्ये अनुक्रमे 7 आणि 2 कारखाने सुरु झाले आहेत. तामिळनाडूमध्ये 4.71 लाख मेट्रिक टन उसाचे गाळप होऊन 0.40 लाख मेट्रिक टन साखर उत्पादन झाले आहे.


















