पुणे : तब्बल १५ वर्षानंतर यशवंत कारखान्याकडून शेतकऱ्यांना थकीत ऊस बिलांचे वाटप सुरू

पुणे: श्री चिंतामणी यशवंत सहकारी साखर कारखाना बंद पडल्यामुळे २००९-१० आणि २०१०-११ या गळीत हंगामातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची देणी सुमारे १५ वर्षांपासून थकली होती. दोन वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीनंतर आलेल्या संचालक मंडळाने कारखान्याची काही जमीन कृषी उत्पन्न बाजार समितीला विकली. यातून मिळालेल्या रकमेतून शेतकरी, कामगार, बँका आणि इतर शासकीय देणी देण्याचा निर्णय घेण्यात आला. याच उपक्रमाचा भाग म्हणून मंगळवारी धनादेश वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात धनादेश वाटप करण्यात आले. या कारखान्याला २००९ ते २०१० आणि २०१० – २०११ या काळात ऊस पुरवठा केलेल्या शेतकऱ्यांची १४ कोटी ७ लाख ४ हजार ६५९ रुपये ऊस बिले थकीत होती.

थेऊर येथील श्री चिंतामणी यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांना १५ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर थकीत ऊस बिलांचे वाटप सुरू झाले आहे. संचालक मंडळाच्या प्रयत्नांमुळे यंदाची दिवाळी गोड होणार आहे. याबाबत माहिती देताना कारखान्याचे अध्यक्ष सुभाष जगताप म्हणाले की, प्रशासकीय काळात पेमेंट शीट तयार नसल्याने धनादेश वाटपात अडचणी आल्या. मात्र, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या मदतीने अंतिम याद्या तयार करून थकबाकी देण्याचा निर्णय घेतला. लवकरच कारखाना नव्या जोमाने सुरू करून सभासदांचा विश्वास सार्थ ठरवू, असा संकल्पही त्यांनी व्यक्त केला. दिवाळीपूर्वी सर्व धनादेश शेतकऱ्यांच्या घरी पोहोचवण्याचा संचालक मंडळाचा मानस आहे. कार्यक्र्मात आमदार ज्ञानेश्वर कटके म्हणाले, आज एका डोळ्यात अश्रू आणि एका डोळ्यात समाधान अशा भावनांनी शेतकरी दिवाळी साजरी करणार आहेत. कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती प्रकाश जगताप, उपसभापती नाना आबनावे, उपाध्यक्ष रत्नाबाई काळभोर, ज्येष्ठ मार्गदर्शक प्रताप गायकवाड, बळूआप्पा चौधरी, राजेंद्र खांदवे, सूर्यकांत काळभोर, संदीप गोते, शशिकांत गायकवाड, संचालक संतोष कांचन, किशोर उंद्रे, राहुल घुले, सुनील कांचन आदी उपस्थित होते.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here