नाशिक : निफाड साखर कारखान्याच्या पुनरुज्जीवनासाठी ग्रामस्थांचा पुढाकार, आमदार रोहित पवार यांना दिले निवेदन

नाशिक : निफाड सहकारी साखर कारखाना (निसाका) पुन्हा सुरू करण्यासाठी पिंपळस रामाचे येथील ग्रामस्थांनी पुढाकार घेतला आहे. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले. कारखान्याच्या पुनरुज्जीवनासाठी उपलब्ध पर्यायांचा गांभीर्याने विचार करून शेतकरी व कामगारांच्या हिताला प्राधान्य द्यावे, अशी भूमिका ग्रामस्थांनी मांडली. ‘निसाका’ हा केवळ साखर कारखाना नसून हजारो शेतकरी, कामगार आणि त्यांच्या कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा आधार आहे. त्यामुळे आश्वासनांपलीकडे जाऊन कारखाना सुरू करण्यासाठी प्रत्यक्ष कृती होणे गरजेचे असल्याचे किरण सुरवाडे यांनी सांगितले.

अनेक वर्षांपासून कारखाना बंद असल्याने ऊस उत्पादक शेतकरी, कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. हा कारखाना पुन्हा सुरू झाल्यास परिसरातील शेती आणि अर्थव्यवस्थेला चालना मिळू शकते. त्यामुळे आमदार पवार यांनी कारखाना सुरू करण्याबाबत ठोस आणि सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. यावेळी किरण सुरवाडे, योगेश आढाव, बंडू अण्णा आहेर, राम सुरवाडे, संतोष मत्सागर, अरुण डांगळे, गोकुळ पवार, पिंटू शेख, नारायण देवकर, नाना पवार, हरी निकम, तुषार निकम आदी उपस्थित होते.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here