पुरवठा पूर्ववत झाल्याने 2027 च्या चौथ्या तिमाहीपर्यंत ब्रेंट कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल 77 डॉलरपर्यंत घसरण्याची शक्यता : EIA

वॉशिंग्टन : जागतिक स्तरावर कच्च्या तेलाचा पुरवठा सुधारल्याने आणि तेलाच्या साठ्यात पुन्हा वाढ होण्यास सुरुवात झाल्याने 2027 च्या चौथ्या तिमाहीत ब्रेंट कच्च्या तेलाची सरासरी किंमत प्रति बॅरल 77 डॉलरपर्यंत खाली येऊ शकते, असा अंदाज अमेरिकेच्या ऊर्जा माहिती प्रशासनाने (EIA) व्यक्त केला आहे. मात्र, सागरी वाहतूक मार्गांवरील व्यत्यय कायम राहिल्यास तेलाच्या किमतींमध्ये चढ-उतार होण्याची शक्यता असल्याचा इशाराही संस्थेने दिला आहे.

EIA ने नोव्हेंबर 2026 च्या आपल्या शॉर्ट-टर्म एनर्जी आउटलुक अहवालात म्हटले आहे की, यंदा नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यांत ब्रेंट कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल सुमारे 100 डॉलर राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर मध्यपूर्वेतील तेल उत्पादन हळूहळू पूर्ववत झाल्याने 2027 च्या दुसऱ्या तिमाहीत तेलाचे दर प्रति बॅरल 90 डॉलरच्या खाली येऊ शकतात. EIA ने म्हटले आहे की, “पुढील वर्षभरात जागतिक तेलसाठ्यात वाढ होत गेल्याने 2027 च्या चौथ्या तिमाहीत ब्रेंट स्पॉट किमतीची सरासरी प्रति बॅरल 77 डॉलरपर्यंत घसरण्याचा आमचा अंदाज आहे.”

ChiniMandi WhatsApp Channel

संस्थेच्या मते, 2026 च्या तिसऱ्या तिमाहीत जागतिक तेलसाठ्यात दररोज सरासरी 12 लाख बॅरलची घट झाली होती. मात्र, पुढील वर्षाच्या पहिल्या सहामाहीत जागतिक तेलसाठ्यात दररोज 35 लाख बॅरलची वाढ होण्याची अपेक्षा आहे. इराण वगळता मध्यपूर्वेतील बहुतांश देशांचे तेल उत्पादन 2027 च्या दुसऱ्या तिमाहीच्या अखेरीस संघर्षापूर्वीच्या पातळीवर येईल, असा EIA चा अंदाज आहे. मात्र, अंदाजित कालावधीत इराणच्या तेल निर्यातीवरील मर्यादा कायम राहण्याची शक्यता आहे.

होर्मुझ सामुद्रधुनी आणि पर्यायी सागरी मार्गांद्वारे होणारा तेलपुरवठा अजूनही व्यत्ययांच्या धोक्याखाली असल्याचे EIA ने स्पष्ट केले आहे. त्यामुळे अल्पकालीन काळात तेलाच्या किमतींमध्ये मासिक अंदाजापेक्षा अधिक चढ-उतार होऊ शकतात, असा इशाराही देण्यात आला आहे. ऑक्टोबर महिन्यात ब्रेंट कच्च्या तेलाची सरासरी किंमत प्रति बॅरल 124 डॉलरवर पोहोचली होती. जुलै 2022 नंतरची ही सर्वाधिक पातळी होती. जागतिक तेलसाठ्यातील घट, तेलवाहू टँकरवरील हल्ले आणि मर्यादित सागरी वाहतूक क्षमतेमुळे तेलाचा पुरवठा कमी झाला होता. त्यानंतर 4 नोव्हेंबर रोजी तेलाचे दर प्रति बॅरल 100 डॉलरच्या खाली आले.

2026 मध्ये तेलाची मागणी कमी राहिल्यानंतर 2027 मध्ये त्यात दररोज सरासरी 20 लाख बॅरलची वाढ होण्याचा अंदाज आहे. तेलपुरवठ्यात सुधारणा आणि किमती कमी झाल्यामुळे तेलाच्या वापराला चालना मिळण्याची अपेक्षा आहे. दरम्यान, अमेरिकेतील कच्च्या तेलाचे उत्पादन 2027 मध्ये दररोज विक्रमी 1.43 कोटी बॅरलपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. यंदाच्या वर्षातील अंदाजित 1.39 कोटी बॅरल प्रतिदिन उत्पादनाच्या तुलनेत ही वाढ 3 टक्के असेल.

अमेरिकेतील वाढते देशांतर्गत उत्पादन आणि निव्वळ आयातीत होणारी वाढ यामुळे कच्च्या तेलाच्या साठ्यात पुन्हा वाढ होण्यास मदत मिळेल, अशी अपेक्षा आहे. EIA च्या अंदाजानुसार, तेलपुरवठ्यातील अडचणी कमी झाल्यास पुढील वर्षी जागतिक कच्च्या तेलाच्या किमती घसरू शकतात. मात्र, भू-राजकीय तणाव आणि सागरी वाहतुकीशी संबंधित धोके यामुळे तेलबाजारातील अनिश्चितता कायम राहण्याची शक्यता आहे.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here