सांगली : रायगाव ओंकार साखर कारखाना युनिट नंबर १६ चा २०२६-२७ च्या गळीत हंगामानिमित्त बॉयलर अग्निप्रदीपन व गळीत हंगाम प्रारंभ उत्साहात झाला. कारखान्याच्या प्रगतीसाठी सर्वांनी एकजुटीने काम करावे. अडचणीतील एखादी संस्था अडचणीतून बाहेर काढणे व उच्चांकी दर देणे, हे शेतकऱ्यांमुळेच शक्य होऊ शकते. येत्या हंगामात जिल्ह्यात उच्चांकी दर, आठ दिवसाला बिल व तोडणी वाहतूकदारांची बिल अदा केले जाईल, अशी घोषणा यावेळी ओंकार समुहाचे प्रमुख बाबूराव बोत्रे-पाटील यांनी केले. गत हंगामातील ऊसबिल देण्यास विलंब झाल्याबद्दल बोत्रे-पाटील यांनी दिलगिरी व्यक्त केली.
गळीत हंगाम प्रारंभप्रसंगी माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, बाबूराव बोत्रे-पाटील, शिवाजी कदम, उज्ज्वला कदम, तेजस्विनी बर्गे यांच्यासह ऊस उत्पादक शेतकरी व तोडणी वाहतूक कंत्राटदार, अधिकारी उपस्थित होते. कारखान्याचे सरव्यवस्थापक जितेंद्र माने-देशमुख यांनी कारखान्याच्या वाटचालीची व आगामी गळीत हंगामाच्या नियोजनाबाबत माहिती दिली. कर्मचाऱ्यांना नोव्हेंबर-२०२६ पासून १० टक्के वेतनवाढ देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपावलीनिमित्त शेतकऱ्यांना व कर्मचाऱ्यांना मोफत साखरेचे वाटप करण्यात आले. देशमुख यांनी कारखाना शेतकऱ्याचे जीवनमान उंचावणार आहे. त्यासाठी साखर कारखान्याला सभासदांनी आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले.

















