बीड : दिवाळीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर ओंकार साखर कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा दिला आहे. पागरी (ता. परळी) येथील ओंकार साखर कारखाना प्रा. लि. युनिट क्रमांक ०८ कडून गळीत हंगाम २०२५-२६ मध्ये ऊस पुरवठा केलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर उर्वरित १०० रुपये प्रतिमेट्रिक टनप्रमाणे ऊसबिलाचा हप्ता जमा करण्यात आला आहे. सणासुदीच्या काळात ही रक्कम मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
ओंकार ग्रुपचे चेअरमन बाबुराव बोत्रे-पाटील यांनी मागील गळीत हंगामाच्या प्रारंभीच बीड जिल्ह्यातील सर्वाधिक ऊसदर जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा दिला होता. हंगाम २०२५-२६ साठी कारखान्याला ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रतिमेट्रिक टन ३,०५० रुपये दर देण्याचे जाहीर करण्यात आले होते. यापैकी २,९५० रुपये प्रतिटन यापूर्वीच अदा करण्यात आले होते. आता उर्वरित १०० रुपये प्रतिटनप्रमाणे रक्कमही शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आली आहे. त्यामुळे जाहीर केलेला ऊसदर पूर्ण करण्याच्या दिशेने कारखान्याने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.
शेतकऱ्यांच्या कष्टाचा योग्य मोबदला मिळावा, यासाठी ओंकार ग्रुप कटिबद्ध असल्याचे चेअरमन बाबुराव बोत्रे-पाटील यांनी सांगितले. चालू गळीत हंगाम २०२६-२७ मध्येही कारखान्याला पुरवठा झालेल्या तसेच यापुढे होणाऱ्या उसाला वाजवी दर देण्याबरोबरच ऊसबिलाची रक्कम शक्य तितक्या लवकर अदा करण्याचे नियोजन करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला संपूर्ण ऊस ओंकार साखर कारखान्याला पुरवठा करून सहकार्य करावे, असे आवाहन चेअरमन बाबुरावजी बोत्रे-पाटील आणि जनरल मॅनेजर सुधाकर व्ही. सोळंके यांनी केले आहे.


















