रब्बी २०२६-२७ हंगामासाठी ६२,३७० कोटींचे खत अनुदान मंजूर; मागील वर्षाच्या तुलनेत ६४ टक्क्यांनी वाढ

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत रब्बी २०२६-२७ हंगामासाठी फॉस्फेटिक आणि पोटॅश (P&K) खतांच्या पोषकद्रव्य आधारित अनुदान (NBS) दरांना मंजुरी देण्यात आली. या हंगामात खत अनुदानासाठी केंद्र सरकारकडून अंदाजे ६२ हजार ३७०.०२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत ही रक्कम सुमारे ६४ टक्क्यांनी अधिक आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार, रब्बी २०२६-२७ हंगामासाठी मंजूर करण्यात आलेली अनुदानाची रक्कम मागील हंगामापेक्षा २४ हजार ४१७.७३ कोटी रुपयांनी जास्त आहे. रब्बी २०२५-२६ हंगामात खत अनुदानासाठी ३७ हजार ९५२.२९ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती.

नवीन अनुदानाचे दर १ ऑक्टोबर २०२६ ते ३१ मार्च २०२७ या कालावधीत लागू राहणार आहेत. रब्बी हंगामात शेतकऱ्यांना परवडणाऱ्या दरात खत उपलब्ध करून देणे हा या निर्णयाचा मुख्य उद्देश आहे.केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर माहिती देताना केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, या संपूर्ण प्रक्रियेमुळे देशांतर्गत खत उत्पादनाला चालना मिळेल आणि शेतकऱ्यांवर कोणताही अतिरिक्त आर्थिक बोजा पडणार नाही.आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खतांच्या तसेच त्यांच्या कच्च्या मालाच्या किमतींमध्ये होत असलेल्या बदलांचा विचार करून अनुदानाच्या दरांचे तर्कसंगत निर्धारण करण्यात आल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.

ChiniMandi WhatsApp Channel

या अनुदान योजनेत डाय-अमोनियम फॉस्फेट (डीएपी), एनपीकेएस यांसह विविध फॉस्फेटिक आणि पोटॅश खतांचा समावेश आहे. मंजूर अनुदानाच्या दरानुसार खत उत्पादक कंपन्यांना सरकारकडून अनुदान दिले जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना ही खते परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.सध्या केंद्र सरकार खत उत्पादक आणि आयातदार कंपन्यांच्या माध्यमातून डीएपीसह पी अँड के खतांच्या २८ प्रकारांची विक्री शेतकऱ्यांना अनुदानित दरात करत आहे.

विशेष म्हणजे, पोषकद्रव्य आधारित अनुदान (एनबीएस) योजना १ एप्रिल २०१० पासून लागू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत फॉस्फेटिक आणि पोटॅश खतांमधील पोषकद्रव्यांच्या प्रमाणानुसार अनुदान दिले जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना आवश्यक खते वाजवी दरात उपलब्ध करून देणे शक्य होते.यंदाच्या अनुदानाचे दर निश्चित करताना युरिया, डीएपी, एमओपी आणि सल्फर यांसह विविध खतांच्या तसेच कच्च्या मालाच्या आंतरराष्ट्रीय बाजारातील किमतींचा विचार करण्यात आला आहे. या निर्णयामुळे आगामी रब्बी हंगामात शेतकऱ्यांना खतांचा सुरळीत पुरवठा होण्यास मदत होणार आहे.

 

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here