पुणे : गेल्या अकरा वर्षांपासून बंद असलेल्या येथील नॅशनल हेवी इंजिनिअरिंग कारखान्याच्या पुनरुज्जीवन प्रकल्पाचे भूमिपूजन रविवारी (ता. १५) केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते होणार आहे. भूमिपूजनानंतर दीड ते दोन वर्षांत कारखान्यात प्रत्यक्ष उत्पादन सुरू करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे या उद्योगाला पुन्हा उभारी मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. या कारखान्याशी संबंधित कामगारांचे प्रलंबित प्रश्नही टप्प्याटप्प्याने मार्गी लावण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत. केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून या प्रकल्पासाठी पाठपुरावा सुरू आहे. सर्व प्रलंबित प्रश्न सोडविण्यावर आगामी काळात भर दिला जाणार आहे, अशी माहिती केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली.
मोहोळ यांनी सांगितले की, नॅशनल हेवी कारखान्याच्या पुनरुज्जीवनाबरोबरच साखर कारखाना आणि दूध डेअरीचेही आधुनिकीकरण करण्यात येणार आहे. आधुनिक यंत्रसामग्री आणि तंत्रज्ञानाचा वापर करून या संस्थांची उत्पादनक्षमता वाढविण्याचे नियोजन आहे. त्यामुळे औद्योगिक क्षेत्रासह सहकार क्षेत्रालाही नवसंजीवनी मिळण्याची अपेक्षा आहे. रविवारी पुनरुज्जीवन प्रकल्पाच्या भूमिपूजनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार उपस्थित राहणार आहेत. पत्रकार परिषदेला माजी मंत्री बाळा भेगडे, नगराध्यक्ष संतोष दाभाडे, भाजप किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष गणेश भेगडे, सावली बोत्रे आदी उपस्थित होते.


















