सांगली : साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झाल्याने शहरातील रस्त्यांवर ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर-ट्रॉलींची वर्दळ वाढली आहे. या वाहनांमुळे वाहतूक कोंडीसह अपघातांच्या घटनांमध्येही वाढ होत असल्याने सांगली शहरात दिवसा ऊस वाहतुकीस बंदी घालण्यात आली आहे. सकाळी ८ ते रात्री १० या वेळेत शहराच्या हद्दीतून ऊस वाहतूक करण्यास पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांनी मनाई आदेश जारी केला आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर आता थेट दंडात्मक आणि कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा शहर वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक अजय सिंदकर यांनी दिला आहे.
जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम वेगाने सुरू असल्याने ग्रामीण भागातून कारखान्यांकडे ऊस घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टर-ट्रॉलींची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र, अनेक वाहनचालक बाह्यवळण मार्गाचा वापर न करता सांगली शहरातील प्रमुख आणि वर्दळीच्या रस्त्यांवरून वाहतूक करीत आहेत. परिणामी, सकाळी आणि सायंकाळच्या गर्दीच्या वेळी प्रमुख चौकांमध्ये वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. याचा फटका शालेय विद्यार्थी, नोकरदार तसेच सर्वसामान्य नागरिकांना बसत असून, प्रवासासाठी अधिक वेळ खर्च करावा लागत आहे.
ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे अपघातांचाही धोका वाढला आहे. गेल्या दोन दिवसांत शहरात ट्रॅक्टर उलटण्याच्या दोन घटना घडल्या. काळी खण परिसरात उसाने भरलेला ट्रॅक्टर उलटल्याने संबंधित मार्गावरील वाहतूक बराच काळ विस्कळीत झाली होती. ही घटना ताजी असतानाच कॉलेज कॉर्नर या गजबजलेल्या परिसरातही ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटल्याने वाहतूक ठप्प झाली. या दोन्ही घटनांमध्ये सुदैवाने जीवितहानी झाली नाही. मात्र, शहराच्या मध्यवर्ती भागात अशा घटना घडत असल्याने पादचारी आणि दुचाकीस्वारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
वाढती वाहतूक कोंडी आणि संभाव्य अपघात रोखण्यासाठी पोलिस प्रशासनाने आता कठोर भूमिका घेतली आहे. पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांच्या आदेशानुसार सकाळी ८ ते रात्री १० या वेळेत सांगली शहराच्या हद्दीत कोणत्याही प्रकारच्या ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना प्रवेश करता येणार नाही. यापूर्वी वाहतूक शाखेकडून वाहनचालक आणि वाहतूकदारांना समज देऊन नियमांचे पालन करण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. मात्र, तरीही नियमांचे उल्लंघन सुरू राहिल्यास संबंधित वाहनचालकांवर कोणतीही दयामाया न दाखवता कारवाई केली जाणार आहे.
शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवणे आणि नागरिकांच्या जीविताचे संरक्षण करणे हा या निर्णयामागील मुख्य उद्देश आहे. दिवसा शहरातून ऊस वाहतूक करताना कोणतेही वाहन आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे पोलिस निरीक्षक अजय सिंदकर यांनी स्पष्ट केले.

















