सांगली : महामार्ग पोलिस केंद्र, कवठेमहांकाळ विभागाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक युवराज पाटील यांच्या सूचनेनुसार ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना रस्ते सुरक्षिततेच्या दृष्टीने रिफ्लेक्टरचे वाटप करण्यात आले. डफळापूर-कुडणूर येथील श्रीपती शुगर अँड पॉवर लि.मार्फत हा उपक्रम राबवण्यात आला. कारखानास्थळी झालेल्या कार्यक्रमात वाहनचालकांना रिफ्लेक्टरचे वाटप करण्यात आले.’ श्रीपती शुगर’चे चीफ इंजिनिअर यशवंत जाधव, सुरक्षा अधिकारी तानाजी चव्हाण, काटा इन्चार्ज नासीर मलाबादे, ऊसपुरवठा अधिकारी संभाजी रानगे यांच्यासह अधिकारी-कर्मचारी, वाहनचालक सहभागी झाले.
यावेळी सहाय्यक पोलिस निरीक्षक युवराज पाटील यांनी सांगितले की, वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर रात्री वाहन सहजपणे दिसावे, मागून होणारे अपघात टाळावेत या उद्देशाने रिफ्लेक्टर आवश्यक आहेत. तर ऊस गाळप हंगामाच्या कामकाजात शेतकरी, चालक आणि कारखाना यांच्यातील सुसंगती अधिक मजबूत राहावी, सुरक्षितता प्रथम प्राधान्याने घेण्यात यावी, यासाठी उपक्रम केल्याचे कारखाना प्रशासनाने म्हटले आहे.

















