सोलापूर : जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतरही काही साखर कारखान्यांचे धुराडे सुरूच; फडातील ऊसतोड व वाहतूक बंद, यार्डातील उसाचे गाळप सुरू

सोलापूर : ऊसदरवाढीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केलेल्या आंदोलनानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी १९ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या बैठकीपर्यंत शेतातील ऊसतोड बंद ठेवण्याचे लेखी आदेश दिले आहेत. या आदेशानुसार जिल्ह्यातील बहुतांश साखर कारखान्यांनी फडातील ऊसतोड आणि वाहतूक थांबवली आहे. मात्र, यापूर्वी तोडून कारखान्यांच्या यार्डात आणून ठेवलेल्या उसाचे गाळप अद्याप सुरूच आहे. उत्तर सोलापूर तालुक्यातील लोकमंगल अॅग्रो आणि सिद्धनाथ शुगर हे दोन्ही कारखाने मंगळवारी दिवसभर सुरू होते. दुसरीकडे, अक्कलकोट तालुक्यातील ओंकार शुगरचेही गाळप सुरू असल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाच्या अंमलबजावणीबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकरी संघटना पुन्हा आंदोलनाच्या तयारीत असल्याचे चित्र आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर फडातील ऊसतोड थांबवली

ChiniMandi WhatsApp Channel

अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, माढा, माळशिरस आणि मंगळवेढ्यासह जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील साखर कारखान्यांनी फडातील ऊसतोड आणि वाहतूक बंद केली आहे. मात्र, कारखान्यांच्या केन यार्डात शिल्लक असलेल्या उसाचे गाळप सुरू ठेवण्यात आले आहे.

दक्षिण सोलापूर तालुक्यातील लोकमंगल शुगर आणि कुमठे येथील श्री सिद्धेश्वर कारखान्याने ऊसतोड बंद केली आहे. श्री सिद्धेश्वर कारखान्यात प्रतिदिन पाच हजार मेट्रिक टन क्षमतेने गाळप सुरू आहे. जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश मिळताच शेतातील ऊसतोड थांबवून यार्डातील शिल्लक उसाचे गाळप सुरू ठेवण्यात आले. भंडारकवठे येथील लोकमंगल शुगरच्या यार्डात मंगळवारी सायंकाळी सुमारे पाच हजार मेट्रिक टन ऊस शिल्लक होता. यापूर्वी तोडलेला तीन हजार मेट्रिक टन ऊस कारखान्यात आणायचा की फडातच ठेवायचा, याबाबत निर्णय झालेला नव्हता.

तडवळ येथील ओंकार शुगरच्या युनिट क्रमांक पाचमध्ये ११ हजार मेट्रिक टन ऊस यार्डात शिल्लक असून, प्रतिदिन पाच हजार मेट्रिक टन गाळप सुरू आहे. रुद्धेवाडी येथील युनिट क्रमांक १५ मध्ये सहा हजार मेट्रिक टन ऊस यार्डात शिल्लक आहे, तर पाच हजार मेट्रिक टनांपेक्षा अधिक ऊस शेतात तोडून पडला आहे. धोत्री येथील ओंकार शुगर ग्रुपच्या युनिट क्रमांक २१ मध्ये गाळपाची तयारी पूर्ण झाली आहे. तसेच तेरा मैल-औराद येथील लोकशक्ती शुगरनेही ऊसतोड आणि वाहतूक थांबवली आहे. कारखाना परिसरातील शिल्लक ऊस पहाटेपर्यंत गाळप करून संपविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

उत्तर सोलापूर तालुक्यातील दोन कारखाने दिवसभर सुरू

उत्तर सोलापूर तालुक्यातील दोन्ही साखर कारखाने मंगळवारी दिवसभर सुरू होते. मंगळवारी सकाळी १० वाजेपर्यंत तोडणी झालेल्या उसाचे गाळप पूर्ण करून हे कारखाने १९ नोव्हेंबरपर्यंत बंद ठेवण्याचे नियोजन होते. मात्र, यार्डात ऊस शिल्लक असल्याने बीबीदारफळ येथील लोकमंगल अॅग्रो आणि तिऱ्हे येथील सिद्धनाथ शुगर हे दोन्ही कारखाने दिवसभर सुरू राहिले.

माढा तालुक्यातील तीन कारखान्यांची शेतातील ऊसतोड बंद

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सोमवारी केलेल्या आंदोलनानंतर जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी मंगळवारी सकाळी १० वाजल्यानंतर साखर कारखान्यांनी ऊसतोड बंद ठेवण्याचे आदेश दिले. या आदेशाला प्रतिसाद देत पिंपळनेर येथील विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना, ओंकार शुगर प्रा. लि. आणि आ. बबनराव शिंदे शुगर अलाईड या तीन कारखान्यांनी मंगळवारी सकाळी १० वाजल्यापासून शेतातील प्रत्यक्ष ऊसतोड बंद केली.

मात्र, यापूर्वीच शेतकऱ्यांच्या शेतात तोडून ठेवलेला ऊस वाहनांद्वारे कारखान्यांपर्यंत आणण्याचे काम दिवसभर सुरू होते. त्याचबरोबर कारखान्यांच्या यार्डात शिल्लक असलेल्या उसाचे गाळपही सुरू ठेवण्यात आले. त्यामुळे प्रत्यक्ष ऊसतोड बंद असली, तरी तिन्ही कारखान्यांचे धुराडे सुरूच असल्याचे चित्र दिसून आले. शेतातील ऊसतोड थांबवून तिन्ही कारखान्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला प्रतिसाद दिला आहे. शेतातून वाहतूक करून आणलेला आणि यार्डात शिल्लक असलेला ऊस संपेपर्यंत गाळप सुरू राहणार असल्याचे कारखाना प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here