सांगली : जिल्ह्यातील आठ कारखान्यांकडून पहिली उचल जाहीर, एन. डी. पाटील शुगर्स कारखान्याकडून उच्चांकी ४ हजार रुपये पहिली उचल

सांगली : दुष्काळामुळे गळीत हंगाम लवकर सुरू करण्याचा निर्णय घेतला गेला तरी ऊस दरासाठीच्या आंदोलनामुळे त्यास उशीर झाला. कोल्हापूर जिल्ह्यात आंदोलनानंतर तोडगा काढला गेला. मात्र, सांगली जिल्ह्यातील कारखान्यांनी पुढे येऊन एकत्र निर्णय जाहीर करण्याऐवजी आपापल्या कारखान्याबाबत घोषणा करणे पसंत केले आहे. जिल्ह्यातील तीन कारखान्यांनी पहिली उचल ३९०० रुपये जाहीर केली आहे. वाळवा तालुक्यातील वाघवाडी येथील एन. डी. पाटील शुगर्स कारखान्याने उच्चांकी ४ हजार रुपयांची पहिली उचल जाहीर केली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील आठ कारखान्यांनी पहिली उचल जाहीर केली आहे. तर आणखी आठ साखर कारखान्यांकडून दर जाहीर होण्याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना आहे. ‘हुतात्मा’ कारखाना पहिली उचल प्रतिटनाला ३९०८ रुपये देणार असल्याची माहिती कारखान्याच्या अध्यक्षा जयश्री अहिर यांनी दिली आहे.

अध्यक्ष अहीर व हुतात्मा बँकेचे अध्यक्ष किरण नायकवडी यांनी दिलेल्या माहितीनुसार, कारखाना गळीत हंगाम २०२६-२७ साठी येणाऱ्या उसाला पहिली उचल प्रतिटन ३९०८ रुपये देईल. इतर कारखान्यांप्रमाणे आणखी जादा रक्कम देणार आहे. चालू वर्षी गाळपाचे उद्दिष्ट ६ लाख टन आहे. आजअखेर १ लाख ४३ हजार २१० टन उसाचे गाळप होऊन सरासरी १०. ५० टक्के साखर उतारा मिळाला. १ लाख ४३ हजार ७५० क्विंटल साखरेचे उत्पादन झाल्याची माहिती देण्यात आली. तर डॉ. पतंगराव कदम सोनहिरा कारखान्याची पहिली उचल ३९०० रुपये असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष मोहनराव कदम यांनी दिली. सभासद शेतकऱ्यांनी कायमच कारखान्यावर विश्वास दाखवला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही कारखान्याने उत्तम तोडणी यंत्रणा राबवली आहे. सर्व सभासद शेतकऱ्यांनी ऊस गळितास कारखान्यास पाठवावा, असे आवाहन त्यांनी केले. तर राजारामबापू कारखान्याच्या तीन युनिटकडून ३९०० रुपये दर जाहीर करण्यात आल्याची माहिती अध्यक्ष प्रतीक पाटील यांनी पत्रकाद्वारे दिली आहे. वाटेगाव सुरुल, साखराळे आणि कारंदवाडी युनिटचा यात समावेश आहे.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here