नवी दिल्ली : भारताने तंबाखू उत्पादन क्षेत्रातील थेट परकीय गुंतवणुकीवरील (एफडीआय) २०१० मधील बंदी हटवावी आणि १९९९ पासून लागू असलेल्या औद्योगिक परवाना निर्बंधांचा फेरआढावा घ्यावा, अशी शिफारस इंडिया फाउंडेशनच्या अहवालात करण्यात आली आहे. सध्याच्या नियमांमुळे बाजारातील स्पर्धा मर्यादित झाली आहे; मात्र तंबाखूचे सेवन कमी करण्यात या निर्बंधांची परिणामकारकता सिद्ध झालेली नाही, असे अहवालात नमूद केले आहे.
पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या (EAC-PM) सदस्य डॉ. शामिका रवी यांच्या हस्ते इंडिया फाउंडेशनचे व्हिजिटिंग फेलो डॉ. राघव पांडे यांनी तयार केलेल्या ‘द अॅनाटॉमी ऑफ अ प्रोहिबिशन : इन्व्हेस्टमेंट लॉ अँड द रिफॉर्म ऑफ इंडियाज टोबॅको सेक्टर’ या अहवालाचे प्रकाशन करण्यात आले.
ऑक्टोबर २०२६ मध्ये प्रसिद्ध झालेल्या या अहवालात सध्याची एफडीआय बंदी हटवून त्याऐवजी अटींसह गुंतवणुकीची परवानगी देणारी व्यवस्था लागू करण्याची शिफारस करण्यात आली आहे. या व्यवस्थेत तंबाखू उत्पादक शेतकरी, उत्पादन क्षमता आणि सार्वजनिक आरोग्याच्या संरक्षणासाठी आवश्यक तरतुदी असाव्यात, असे अहवालात म्हटले आहे.
अहवालानुसार, सिगार, चेरूट, सिगारिलो आणि सिगारेट तसेच तंबाखू किंवा तंबाखूच्या पर्यायांपासून बनणाऱ्या उत्पादनांच्या निर्मितीवरील थेट परकीय गुंतवणुकीला प्रतिबंध करणारी तरतूद सरकारने हटवावी. एकत्रित एफडीआय धोरणातील परिच्छेद ५.१(जी) अंतर्गत असलेली ही बंदी काढून टाकण्याबरोबरच सिगारेट उत्पादनासाठी नवीन औद्योगिक परवाने न देण्याच्या सरकारच्या दीर्घकालीन धोरणाचाही आढावा घ्यावा, असे अहवालात सुचवण्यात आले आहे.
अहवालात म्हटले आहे की, “तंबाखू उत्पादन क्षेत्रातील एफडीआयवरील बंदीची तरतूद हटवण्यासोबतच १९९९ पासून सुरू असलेल्या परवाना धोरणाचा तर्कसंगत आढावा घेणे आवश्यक आहे. ”डॉ. पांडे यांनी सांगितले की, भारतीय कृषी अर्थव्यवस्थेत तंबाखू हे महत्त्वाचे नगदी पीक आहे. मात्र, शेतापासून कारखान्यापर्यंत या क्षेत्रावर नियंत्रण ठेवणाऱ्या नियमांमुळे नेमके काय साध्य झाले आणि त्याची किंमत काय मोजावी लागली, याचे सार्वजनिक मूल्यांकन आजवर झालेले नाही.
अभ्यासानुसार, एप्रिल २०१० मध्ये आर्थिक व्यवहारविषयक मंत्रिमंडळ समितीने घेतलेल्या निर्णयानंतर १० मे २०१० रोजी जारी करण्यात आलेल्या प्रेस नोट क्रमांक २ (२०१० मालिका) द्वारे तंबाखू उत्पादन क्षेत्रातील एफडीआयवर बंदी घालण्यात आली होती. मात्र, त्याआधीच १९९९ मध्ये उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाने (DPIIT) आरोग्यविषयक कारणांमुळे सिगारेट उत्पादनासाठी नवीन औद्योगिक परवाने देणे बंद केले होते.
अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे की, औद्योगिक परवान्यांवरील निर्बंधांचा आढावा न घेता केवळ एफडीआयवरील बंदी हटवल्यास सध्याच्या उत्पादन यंत्रणांमध्ये गुंतवणुकीला परवानगी मिळेल. मात्र, त्यामुळे नवीन उत्पादक बाजारात येतील किंवा तंबाखू उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिरिक्त खरेदीदार निर्माण होतीलच, असे नाही.
अहवालात नमूद केले आहे की, “गुंतवणुकीसाठी नव्याने मोकळीक मिळालेल्या व्यक्तीला उत्पादन प्रकल्प उभारण्याची परवानगी मात्र मिळेलच असे नाही. ”सिगारेट उत्पादन क्षेत्रात परकीय गुंतवणुकीला बंदी असली, तरी तंत्रज्ञान सहकार्य, परवाना करार, फ्रँचायझी, ट्रेडमार्क आणि व्यवस्थापन करारांना परवानगी कायम असल्याचेही अहवालात अधोरेखित करण्यात आले आहे.
३० जून २०२६ पर्यंत ब्रिटिश अमेरिकन टोबॅको समूहाशी संबंधित कंपन्यांकडे आयटीसीमध्ये २२.९१ टक्के, तर फिलिप मॉरिस ग्लोबल ब्रँड्सकडे गॉडफ्रे फिलिप्स इंडियामध्ये २५.१० टक्के हिस्सेदारी होती, असे अहवालात नमूद आहे. “त्यामुळे ही बंदी परकीय भांडवलाला पूर्णपणे रोखत नाही, तर २०१० मध्ये बाजाराची जी स्थिती होती तीच कायम ठेवते. विद्यमान कंपन्यांचे वर्चस्व सुरक्षित ठेवून इतर सर्व बिगर-समभाग गुंतवणुकीचे मार्ग मात्र खुले ठेवते,” असे अहवालात म्हटले आहे.
बाजारातील स्पर्धा आणि शेतकऱ्यांच्या हिताचा मुद्दा
बाजारातील वाढत्या एकाधिकाराबाबत चिंता व्यक्त करताना अहवालात म्हटले आहे की, दोन निर्बंधांमुळे तंबाखू बाजाराचा विस्तार किंवा संकोच होण्याऐवजी तो एका विशिष्ट स्थितीत गोठला आहे. यामध्ये २०१० मधील सिगारेट उत्पादन क्षेत्रातील एफडीआय बंदी आणि १९९९ पासून नवीन औद्योगिक परवाने देण्यावर असलेली स्थगिती यांचा समावेश आहे. ही स्थगिती औपचारिकरीत्या अधिसूचितही करण्यात आली नव्हती.
याचा परिणाम म्हणून बाजारात दोन प्रमुख कंपन्यांचे वर्चस्व निर्माण झाले आहे. या कंपन्या लिलावात विकल्या जाणाऱ्या फ्ल्यू-क्युअर्ड व्हर्जिनिया (FCV) तंबाखूच्या ४० ते ६८ टक्के उत्पादनाची खरेदी करतात. सिगारेट निर्मितीसाठी वापरला जाणारा हा तंबाखूचा प्रमुख प्रकार आहे.
या परिस्थितीत शेतकऱ्यांना स्पर्धात्मक बोलींचा लाभ मिळत नाही. तसेच स्वतःच्या उत्पादनावर प्रक्रिया करून त्यापासून उत्पादने तयार करण्याच्या संधीपासूनही ते वंचित राहतात. इतर पिकांच्या उत्पादकांना मात्र अशा प्रकारची संधी उपलब्ध आहे, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
तंबाखू सेवनाचे प्रमाण वाढल्याचा दावा
तंबाखू सेवनाच्या प्रवृत्तीबाबत अहवालात पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या फेब्रुवारी २०२६ मधील कार्यपत्रिकेचा संदर्भ देण्यात आला आहे. या अभ्यासानुसार, तंबाखूवरील खर्चाची नोंद करणाऱ्या शहरी कुटुंबांचे प्रमाण २०११-१२ मधील ३४.९४ टक्क्यांवरून २०२३-२४ मध्ये ४५.६४ टक्क्यांपर्यंत वाढले. त्याच कालावधीत ग्रामीण भागातील तंबाखूवरील खर्चाची नोंद करणाऱ्या कुटुंबांचे प्रमाण ५९.३१ टक्क्यांवरून ६८.४९ टक्क्यांपर्यंत पोहोचले.
ई-सिगारेट कायद्यात बदल आणि तंबाखू संक्रमण निधीची शिफारस
अहवालात इलेक्ट्रॉनिक सिगारेट प्रतिबंध कायदा, २०१९ ऐवजी परवाना आणि उत्पादन मानकांवर आधारित नियामक व्यवस्था लागू करण्याची शिफारस करण्यात आली आहे. तसेच नवीन प्रकारच्या निकोटीन उत्पादनांची विक्री २१ वर्षे आणि त्यापुढील वयाच्या पडताळणी केलेल्या प्रौढांपुरती मर्यादित ठेवण्याचे सुचवण्यात आले आहे.
तंबाखूचे व्यसन सोडण्यासाठी मदत आणि कर्करोग उपचारांसाठी स्वतंत्र ‘तंबाखू संक्रमण निधी’ स्थापन करण्याची शिफारसही अहवालात करण्यात आली आहे. याशिवाय, उत्पादनांवरील निकोटीन आणि टारचे प्रमाण अनिवार्यपणे जाहीर करणे, जाहिरातींवरील निर्बंध अधिक कठोर करणे आणि उत्पादन क्षमता वाढवण्यास किंवा बदलण्यास परवानगी देण्यापूर्वी सार्वजनिक आरोग्य व बाजारातील स्पर्धेवर होणाऱ्या परिणामांचे मूल्यांकन करणे आवश्यक असल्याचे अहवालात म्हटले आहे.
तंबाखू क्षेत्रातील निर्बंधांचा नियमित आर्थिक आढावा घेण्यासाठी कायमस्वरूपी मूल्यांकन यंत्रणा स्थापन करण्याची शिफारसही करण्यात आली आहे. गुंतवणूकविषयक सुधारणांसोबत सार्वजनिक आरोग्याच्या संरक्षणासाठी अधिक मजबूत उपाययोजना लागू व्हाव्यात, हा त्यामागील उद्देश असल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.

















